कोलकाता विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा रवींद्र जडेजा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ८ चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीने कोलकाताच्या तोंडातला विजयी घास हिरावून नेला. आयपीएल २०२१ स्पर्धेतील चेन्नईचा हा तिसरा सलग विजय आहे. त्यामुळे आयपीएल गुणतालिकेत चेन्नईचा संघ अव्वल स्थानी पोहोचला असून प्लेऑफमधलं स्थानही निश्चित झालं आहे. रवींद्र जडेजला कोलकात्याविरुद्धच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर रवींद्र जडेजाने त्याच्या खास रणनितीचा खुलासा केला.

“जेव्हा आपण पाच दिवसांच्या सामन्यात खेळल्यानंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळता,तेव्हा ते कठीण जातं. मी माझ्या बॅट स्विंगवर काम करत होतो. मी जे काही करत होते, ते पुन्हा करण्याच्या प्रयत्नात होतो. शेवटच्या षटकापूर्वी आलेल्या धावा निर्णायक ठरल्या. ऋतुराज आणि फाफने चांगली सुरुवात करून दिली.”, असं रवींद्र जडेजाने सांगितलं. “मी माझ्या ताकदीचा आधार घेत होतो. तो फाइन लेग आणि स्क्वेअर लेगवर गोलंदाजी करत होता. मला वाटले की, तो ऑफ साईडवर टाकेल आणि धीम्या गतीने आखुड टप्प्याचा बॉल असेल. एक चेंडू पुढे असेल आणि सुदैवाने चेंडू कनेक्ट केला”, असंही त्याने पुढे सांगितलं.

दरम्यान, १९ व्या षटकापर्यंत कोलकाताने सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र जडेजाच्या आक्रमक खेळीमुळे सर्व गणितच बदललं. जडेजाने प्रसिद्धच्या एका षटकात २१ धावा केल्या. यात २ षटकार आणि २ चौकारांचा समावेश आहे. तर एक धाव सॅम करेननं एक धाव केली होती. या खेळीमुळे कोलकात्याचा पराभव निश्चित झाला. शेवटच्या षटकात चेन्नईला ४ धावांचा आवश्यकता होती. मात्र संघाला एका विजयी धावेची आवश्यकता असताना जडेजा सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर दीपक चाहरने एक धाव करत संघाला विजय मिळवून दिला.