आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. राजस्थानने सात गडी आणि १५ चेंडू राखून हा सामना जिंकत सीझनमधील पाचवा विजय मिळवलाल. चेन्नईचा पराभव झाला तरी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ऋतुराज गायकवाडने जबरदस्त खेळी करत १०१ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत ऋतुराजनं आपलं शतक साजरं केलं. त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. यामुळे चेन्नईचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर ऋतुराज गायकवाडची चर्चा रंगली होती.

IPL 2021: चेन्नईच्या पुणेकराला राजस्थानच्या मुंबईकरांचा कडवा प्रतिसाद; मुंबईची चिंता वाढली

भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्वीट करत ऋतुराज गायकवाडचं कौतुक केलं आहे. लवकरच ऋतुराज गायकवाडचं जागतिक क्रिकेटवर वर्चस्व असेल असं भाकितही विरेंद्र सेहवागने वर्तवलं आहे. “नाव लक्षात ठेवा, ऋतुराज गायकवाड…मोठ्या खेळींसाठी तयार झालेला विशेष खेळाडू. जागतिक क्रिकेटवर वर्चस्व करणार,” असं ट्वीट विरेंद्र सेहवाने केलं आहे.

समालोचक हर्षा भोगले यांनीदेखील ऋतुराज गायकवाडचं कौतुक केलं आहे. ऋतुराज गायकवाडने उच्चस्तर दाखवला असून आता वरील स्तरावर खेळण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.

राजस्थाननं चेन्नईला सात गडी राखून नमवलं. चेन्नईनं राजस्थानला विजयासाठी ४ गडी गमवून १९० धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान राजस्थाननं ७ गडी आणि १५ चेंडू राखून गाठलं. आयपीएल २०२१ स्पर्धेत सातव्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्सनं चेन्नईला नमवल्याने चौथ्या क्रमाकांसाठी झगडणाऱ्या संघांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे मुंबईचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. या विजयासह राजस्थानचा संघ आयपीएल गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर मुंबईच्या संघाची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.

चेन्नईचा डाव

चेन्नईनं सामन्याची सुरुवात दमदार केली. पहिल्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिसने ४७ धावांची भागीदारी केली. मात्र २५ वैयक्तिक धावसंख्येवर असताना फाफन राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सुरेश रैनाही मैदानात जास्त वेळ तग धरू शकला नाही. ३ धावा करून राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी ऋतुराज आणि मोइन अलीने चांगली भागीदारी केली. संघाच्या ११४ धावा असताना मोइन अली बाद झाला. राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर संजू सॅमसननं त्याला स्टम्पिंग केलं. त्यानंतर अंबाती रायडू मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. रायडू चेतन साकारियाच्या गोलंदाजीवर २ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत ऋतुराजनं आपलं शतक साजरं केलं. त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या.

राजस्थानचा डाव

चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी १९० धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी राजस्थाननं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली. एविन लेवीस आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं पहिल्या गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी केली. यात यशस्वी जैस्वालनं २१ चेंडूत ५० धावा केल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. हे जोडी जमली असताना एविन बाद झाला. त्याने १२ चेंडूत २७ धावा केल्या. त्यानंतर लगेचच यशस्वी बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतरही संघावरील दडपण दूर करत संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी डाव सावरला आणि तिसऱ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विशेष म्हणजे मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या दोघांनी अर्धशतकं ठोकली. यशस्वी जैस्वालने २१ चेंडूत ५० धावा केल्या. तर शिवम दुबेने ४२ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या.