आयपीएल २०२१ स्पर्धेत दिल्लीने हैदराबादवर ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. हैदराबादनं दिलेलं १३५ धावांचं आव्हान दिल्लीने १७.५ षटकात पूर्ण केलं. आघाडीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीनं दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. आक्रमक खेळी खेळणाच्या नादात पृथ्वी शॉ बाद झाला. हैदराबादचा कर्णधार केन विलियमसननं त्याचा अप्रतिम झेल घेतल तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर जोडीने संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. संघाची धावसंख्या ७२ असताना उंच फटका मारण्याच्या नादात धवन बाद झाला. राशीद खानच्या गोलंदाजीवर अब्दुल समादनं त्याचा झेल घेतला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यर ४७ तर ऋषभ पंत ३५ या धावसंख्येवर नाबाद राहिले. या विजयासह दिल्लीचा संघ आयपीएल गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

हैदराबादच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या षटकात डेविड वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्यानंतर वृद्धिमान साहा बाद झाल्याने मधल्या फळीच्या फलंदाजांवर दडपण आलं. केन विलियमसन आणि मनिष पांडे डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र केन विलियमसन संघाच्या ६० धावा असताना बाद झाला. त्यानंतर लगेचच मनिष पांडे आणि केदार जाधव झटपट बाद झाले. अब्दुल समादने चांगली फटकेबाजी केली. त्याने १ षटकार आणि चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. जेसन होल्डर बाद झाल्यानंतर मैदानात रशिद खानने फलंदाजी सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने १९ चेंडूत २२ धावा केल्या यात १ षटकार आणि २ चौकारांचा समावेश आहे. रशिद खान धावचीत होत तंबूत परतला. त्यानंतर शेवटच्या षटकात संदीप शर्मा बाद झाला.

दिल्लीने आयपीएल २०२१ मध्ये खेळलेल्या ९ सामन्यापैकी ७ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असून खात्यात १४ गुण जमा झाले आहेत. तर सनराइजर्स हैदराबादचा खराब फॉर्म सुरुच आहे. या सामन्यात पराभव झाल्याने सर्वात शेवटच्या स्थानी आहेत.

प्लेईंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), मारकस स्टोइनिस, शिम्रॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कगिसो रबाडा, अवेश खान, अनरिच नॉर्टजे
सनराईजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर, वृद्धिमान साहा, मनिष पांडे, केन विलियमसन (कर्णधार), केदार जाधव, जेसन होल्डर, अब्दुल समाद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद