आयपील २०२१ स्पर्धेत दिल्लीला नमवत कोलकाताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे दिल्लीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. दिल्लीनं ५ गडी गमवत १३५ धावा केल्या आणि विजयासाठी १३६ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान कोलकाताने ३ गडी आणि १ चेंडू राखून पूर्ण केलं. दोन चेंडूत ६ धावांची गरज असताना राहुल त्रिपााठीने षटकार ठोकला आणि संघाला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर दिल्लीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर दु:ख स्पष्ट दिसत होतं. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

“सामन्यानंतर काहीही बदलू शकत नाही. आम्ही शक्य तितक्या वेळ जिंकण्यावर विश्वात ठेवत खेळत राहीलो. गोलंदाजांनी ते करून दाखवलं. मधल्या टप्प्यात त्यांनी खरंच चांगली गोलंदाजी केली. आम्ही स्ट्राइक फिरवू शकलो नाही. आम्ही पुढच्या हंगामासाठी जोरदार तयारी करू. आम्ही संपूर्ण हंगामात चांगलं खेळलो. आम्ही एकत्र राहिलो. आशा आहे की, पुढच्या वर्षी आम्ही चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा परत येऊ”, अशा भावना दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने व्यक्त केल्या.

शारजाहच्या संथ खेळपट्टीवर रंगलेल्या या रंगतदार सामन्यात कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा परिणाम आणि कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीला २० षटकात ५ बाद १३५ धावा करता आल्या. प्रत्त्युत्तरात सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशादायक कामगिरी करत थोडी धाकधूक वाढवली. २ चेंडूत ६ धावांची गरज असताना भरवशाचा फलंदाज राहुल त्रिपाठीने षटकार ठोकत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. आयपीएल २०२१चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार आहे.