आयपीएलमध्ये पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पदरी निराशा पडली आहे. १३ वर्षात एकदाही बंगळुरु संघ आयपीएल जिंकू शकलेला नाही. २००९ आणि २०१६ मध्ये बंगळुरु अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता, मात्र अंतिम क्षणी ट्रॉफी हातातून निसटली. या हंगामात सोमवारी कोलकाताविरोधात झालेल्या सामन्यात बंगळुरुचा चार विकेट्स राखून पराभव झाला आणि त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. यामुळे यापुढे बंगळुरु संघाचं भविष्य काय असणार आहे याबाबत चाहत्यांना चिंता सतावत आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं असल्याने पुढील हंगामात संघाचं नेतृत्व कोण करणार आणि संघात कोण असणार हा प्रश्न आहे. डिसेंबरमध्ये आयपीएलचा लिलाव होणार असून यावेळी बंगळुरु संघात अनेक नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. संघाला फक्त तीन खेळाडूच रिटेन करण्याची संधी असते.

भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीरला बंगळुरुने विराट कोहली, मॅक्सवेल आणि चहलला पुढील हंगामात रिटेन करावं का? असं विचारण्यात आलं. ESPNCricinfo च्या ‘हो किंवा नाही’ Yes or No) या कार्यक्रमात एक्स्पर्ट्सना हे प्रश्न विचारले जातात. गंभीरने यावर उत्तर देताना म्हटलं की, “हो…मी हर्षद पटेल आणि चहल यांच्यापैकी एकाची निवड करेन, त्यांच्यातील एकाला घेऊ शकतो. आता हे त्यांच्यावर आहे की चहल किंवा हर्षल यांच्यापैकी कोणाला घ्यायचं”.

दरम्यान गंभीरने यावेळी आरसीबी पुढच्या हंगामातरही एबी डेव्हिलियर्सला संघात घेईल असा अंदाज व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने १५ सामन्यात ३०० धावा ठोकल्या. पण युएईत त्याची कामगिरी इतकी चांगली झाली नाही. बंगळुरु एबी डिव्हिलियर्सला पुन्हा रिटेन करणार नाही का? असं विचारण्यात आलं असता त्याने सांगितलं की, “हो, कारण ते मॅक्सवेलला रिटेन करतील. यामागचं कारण मॅक्सवेल भविष्य आहे, डिव्हिलियर्स नाही”.

गौतम गंभीरने यावेळी विराट कोहलीने युएईमध्ये गेल्यानंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्याने खेळाडूंचं लक्ष विचलित झालं असावं आणि ते सर्वोत्कृष्ट कामगिरी करु शकले नसावेत असं म्हटलं आहे. बंगळुरु चांगली कामगिरी करत असताना कोहलीने ही घोषणा हंगाम संपल्यानंतर करायला हवी होती असं मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.

“मला वाटतं वेळ योग्य नव्हती. जर त्याला कर्णधारपद सोडायचं होतं, तर तो स्पर्धा संपल्यानंतरही जाहीर करु शकत होता. जर त्याने नंतर घोषणा केली असती तर कदाचित बंगळुरु आज चांगल्या स्थितीत असती,” असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.