चेन्नई सुपर किंग्जने ‘आयपीएल’मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर दोन गडी राखून निसटता विजय मिळवला. १० सामन्यांत या आठव्या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे केकेआरसाठी हा स्पर्धेमधील सहावा पराभव ठरलाय. मात्र या पराभवानंतर गौतम गंभीरने सामन्यातील एका घटनेवरुन तिखट शब्दांमध्ये टीका केलीय.

नक्की वाचा >> IPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB च्या चाहत्यांसाठी मात्र…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाता नाइट रायडर्सने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भन्नाट कामगिरी केली होती. भारताच्या या माजी सलामीवीराच्या नेतृत्वाखाली २०११ आणि २०१७ साली कोलकात्याला ही स्पर्धा जिंकवून दिली होती. मात्र गंभीर संघापासून दूर गेल्यानंतरही कोलकात्याचा संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. २०१८ मध्ये संघ प्लेऑफपर्यंत पोहचला होता. मात्र नंतरच्या दोन सिझनमध्ये कोलकात्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. सध्याच्या म्हणजेच २०२१ च्या आयपीएलमध्ये केकेआरला काही खास कामगिरी करता आलेली नाही. १० पैकी ६ सामने त्यांनी गमावले आहेत. तसेच सतत बदलणाऱ्या आपल्या धोरणांमुळे हा संघ खेळापेक्षा धोरणबदलांसाठीच चर्चेत आहे.

नक्की वाचा >> ‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं कर्णधारपद? BCCI कडे विराटच्या Attitude बद्दल केलेली तक्रार

केकेआर विरुद्ध सीएसके सामन्यामध्ये कर्णधार ईऑन मॉर्गनला संघाचा विश्लेषक असणाऱ्या नॅथन लीमनने एक खास संदेश पाठवल्याचं पहायला मिळालं. सामना सुरु असतानाच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला अशाप्रकारे फारच क्वचित प्रसंगी संदेश पाठवला जातो. त्यामुळेच या प्रकरणाची क्रिकेटच्या वर्तुळात चर्चा सुरु झालीय. मात्र गंभीरला ही गोष्ट फार खटकली आहे. याच मुद्द्यावरुन गंभीरने आपल्या या आधीच्या संघाला खडे बोल सुनावले आहेत. इतकच नाही तर आपण कर्णधार असताना असं झालं असतं तर आपण पद सोडलं असतं असही गंभीर म्हणालाय. स्टार स्पोर्ट्सवर माजी फलंदाज आकाश चोप्राने केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गंभीरने हे वक्तव्य केलं आहे. अशाप्रकारचा विश्लेषक तू कर्णधार असताना संघासोबत असता आणि अशी गोष्ट तू कर्णधार असताना घडली असती तर काय केलं असतं? यावर गंभीरने थेट कर्णधारपद सोडलं असतं असं सांगितलं.

केकेआरच्या संघाने सहाय्यक स्टाफ म्हणून ए आर. श्रीकांत यांच्यासोबतच इंग्लंड संघाचा विश्लेषक नॅथन लीमनला आपल्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी निवडलं आहे. मॉर्गन आणि लीमन या जोडीने कर्णधार आणि मार्गदर्शक या जबाबदाऱ्या पार पडताना इंग्लंडच्या संघासाठी भन्नाट कामगिरी केलीय. मात्र त्यांना केकेआरसंदर्भात हे यश आलं नाही.

केकेआरने चेन्नईविरुद्धचा सामना अगदी थोडक्यात गमावला. एका रोमहर्षक सामन्यामध्ये चेन्नई आणि कोलकात्याच्या संघाने आबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर सुंदर खेळ केला. आधी फंलदाजी करत कोलकाताने २० षटकांत ६ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली होती. शुभमन गिल (९) स्वस्तात बाद झाल्यावर राहुल त्रिपाठी (४५) आणि वेंकटेश अय्यर (१८) यांनी कोलकाताचा डाव सावरला. तसेच नितीश राणा (नाबाद ३७) आणि दिनेश कार्तिक (२६) यांनीही चांगली फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभी केली.

कोलकाताने दिलेले १७२ धावांचे आव्हान चेन्नईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड (४०) आणि फॅफ डू प्लेसिस (४३) यांनी चेन्नईच्या डावाची उत्कृष्ट सुरुवात केली. आंद्रे रसेलने ऋतुराजला बाद करत ही जोडी फोडली. तर प्रसिद्ध कृष्णाने डू प्लेसिसला माघारी पाठवले. यानंतर मोईन अली (३२) वगळता मधली फळी अपयशी ठरल्याने चेन्नईला अखेरच्या दोन षटकांत २६ धावांची आवश्यकता होती. कृष्णाने टाकलेल्या १९व्या षटकात जडेजाने दोन चौकार आणि दोन षटकारांसह २२ धावा काढल्या. सुनील नरीनने अखेरच्या षटकात दोन गडी बाद केले. मात्र, शार्दूल ठाकूरच्या तीन धावा आणि अखेरच्या चेंडूवर दीपक चहरने एक धाव काढत चेन्नईला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 gautam gambhir slams kkr management after loss against csk scsg
First published on: 27-09-2021 at 13:26 IST