मुंबईला ‘हैदराबादी हिसका’ दाखवणार?

हैदराबादला उत्तम सांघिक समन्वय साधावा लागणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई इंडियन्सला शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ‘हैदराबादी हिसका’ दाखवण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद उत्सुक आहे. परंतु यासाठी हैदराबादला उत्तम सांघिक समन्वय साधावा लागणार आहे.

धावांसाठी झगडायला लावणाऱ्या चेपॉकवर डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादला यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यांत धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले. यापैकी बेंगळूरुविरुद्ध त्यांना दीडशे धावसंख्येचे लक्ष्य पेलवले नाही. त्यामुळे संघनिवड आणि उदयोन्मुख खेळाडूंच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. या परिस्थितीत कोलकाताला हरवण्याची किमया साधणाऱ्या मुंबईशी सामना करणे, हैदराबादला अवघड जाईल.

सनरायजर्स हैदराबाद

साहाला वगळणार?

जॉनी बेअरस्टो आणि वृद्धिमान साहा या दोन यष्टीरक्षकांना संघात सामावण्याचा निर्णय हैदराबादसाठी धोकादायक ठरत आहे. अनुभवी साहा सलामीच्या भूमिकेला न्याय देण्यात दोन्ही सामन्यांत (७, १) अपयशी ठरला. साहा २००८च्या पहिल्या ‘आयपीएल’पासून खेळणाऱ्या साहाला कोणत्याही हंगामात सातत्यपूर्ण कामगिरीसह छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे साहाऐवजी गुणी युवी खेळाडू प्रियम गर्ग किंवा अभिषेक शर्माला संघात स्थान देता येऊ शकते. अनुभवी केदार जाधवचाही पर्याय उपलब्ध आहे. परदेशी खेळाडूंपैकी फक्त वॉर्नर आणि रशीद खान यांच्याकडूनच अपेक्षित कामगिरी होते आहे. केन विल्यम्सन उपलब्ध झाल्यास फिरकीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा त्याचा गुण हैदराबादला उपयुक्त ठरेल. बेंगळूरुचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाद अहमदविरुद्ध मनीष पांडे आणि अब्दुल समद अपयशी ठरले होते. भारतीय क्रिकेट संघाचा वार्षिक करार न लाभलेला कृणाल पंड्यासुद्धा अपेक्षांची पूर्तता करू शकलेला नाही. गोलंदाजीत टी. नटराजन गतवर्षीप्रमाणे गोलंदाजी करीत नाही, तर भुवनेश्वर कुमारसुद्धा महागडा ठरत आहे. संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल हे पर्यायसुद्धा मुंबईविरुद्ध फारसा प्रभाव पाडू शकणार नाही.

मुंबई इंडियन्स

मोठ्या धावसंख्येचे उद्दिष्ट

कोलकाताविरुद्धचा रंगतदार सामना जिंकल्यानंतर मुंबईच्या संघात बदलाची सुतराम शक्यता नाही. कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यासारख्या धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असलेल्या मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यांत मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. पण खेळपट्टीचे अंदाज खोटे ठरवत धावसंख्येचे इमले बांधण्याची क्षमता असलेले फलंदाज मुंबईकडे आहेत. मुंबईने बेंगळूरुविरुद्ध ९ बाद १५९ आणि कोलकाताविरुद्ध १५२ धावा उभारल्या. बेंगळूरुविरुद्ध सलामीवीर ख्रिस लिनने ४९ धावा केल्या, तर कोलकाताविरुद्ध सूर्यकुामार यादव (५६) आणि रोहित शर्मा (४३) यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. जसप्रीत बुमरा, टें्रट बोल्ट, राहुल चहर मार्को जॅन्सेन यांच्यासारखे गोलंदाज मुंबईकडे आहेत. राहुलने कोलकाताविरुद्ध २७ धावांत ४ बळी घेत सामनावीर किताब पटकावला होता.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2021 hyderabad vs mumbai today abn

ताज्या बातम्या