IPL २०२१च्या मध्यातच सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार!

नियमित कर्णधार डेव्हिड वॉर्नरला हटवले

david warner
डेव्हिड वॉर्नर
आयपीएलच्या २०२१च्या हंगामाच्या मध्यातच सनरायझर्स हैदराबादने मोठा बदल केला आहे. नियमित कर्णधार डेव्हिड वॉर्नरला हटवून संघाने केन विल्यमसनला कर्णधारपद दिले आहे. हैदराबादच्या पुढच्या सर्व सामन्यांसाठी केन कर्णधार असेल. सनरायझर्स हैदराबादने ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

”उद्याच्या आणि आयपीएलच्या आगामी सर्व सामन्यांसाठी केन विल्यमसन सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असेल. उद्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यांसाठी ओव्हरसीज कॉम्बिनेशनची जागा बदलण्याचा निर्णयही संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. व्यवस्थापन डेव्हिड वॉर्नरबद्दल आदर व्यक्त करते आणि मागील वर्षात वॉर्नरचा देखील प्रभाव राहिला आहे. उर्वरित सामन्यांमध्ये वॉर्नर मैदानाच्या आत आणि बाहेर संघाला पाठिंबा देत राहील”, असे हैदराबादने ट्विटरद्वारे सांगितले.

 

फक्त एक विजय…

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. हैदराबादने आतापर्यंत ६ सामने खेळले असून यात त्यांना एक विजय मिळाला आहे. पॉईंट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद सर्वात खाली आहे. संघात सामूहिक कामगिरीचा अभाव असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

डेव्हिड वॉर्नरचे फसलेले प्रयोग…

कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नरने काही सामन्यांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंचा समावेश करण्याचा प्रयोग केला, परंतु त्याची रणनीती अपयशी ठरली. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नरने काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली. मात्र, मधल्या फळीत आणि डेथ ओव्हर्समध्ये हैदराबादच्या फलंदाजांना सातत्याने अपयश आले. मागील हंगामात प्लेऑफमध्ये गेलेला ही संघ यावेळी पूर्णपणे फ्लॉप झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2021 kane williamson has been appointed as the new captain of sunrisers hyderabad adn