अटीतटीचा सामना काय असतो हे बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात पहायला मिळालं. शेवटचा चेंडू टाकून होईपर्यंत सामना कोण जिंकणार हे समजत नाही असं म्हटलं जातं. तसाच काहीचा प्रत्यय या सामन्यामध्ये आला. २४ चेंडूंमध्ये ११ धावा हव्या असतान कोलकाता नाईट रायडर्सचा असा काही गोंधळ झाला की सामन्याच्या अगदी शेवटून दुसऱ्या चेंडूवर त्यांना षटकार मारुन विजय मिळवावा लागला. दिल्ली कॅपिटल्सवर तीन गडी आणि एक चेंडू राखून विजय मिळवताना कोलकात्याच्या संघाला घाम फुटला. २४ चेंडू शिल्लक असताना १२३ वर दोन असा धावफलक होता. जो सामना संपताना १३६ वर सात असा होता. या शेवटच्या २४ चेंडूंमध्ये ११ धावांसाठी कोलकात्याने एक दोन नाही तब्बल पाच विकेट्स गमावल्या.

सहज वाटणारा हा सामना अंत्यंत रोमहर्षक झाला तो शेवटच्या काही षटकांमध्ये. या शेवटच्या २४ चेंडूंमध्ये नक्की काय घडलं पाहूयात बॉल टू बॉल रिपोर्ट…

सामन्यामधील १६ षटकं झाली तेव्हा कोलकात्याची धावसंख्या १२३ धावांवर दोन गडी बाद अशी होती. या वेळी कोलकात्याला २४ चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी १३ धावांची गरज होती. आठ विकेट्स कोलकात्याकडे शिल्लक होत्या.

१७ वे षटक आवेश खानने टाकले. हे षटक कसं होतं पाहूयात…

१६.१ – निर्धाव (फलंदाजीला शुभमन गील)
१६.२ – एक धावा
१६.३ – (फलंदाजीला राहुल त्रिपाठी) एक धावा
१६.४ – शुभमन गील झेलबाद यष्टीरक्षक पंतने घेतला झेल.
१६.५ – दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. पहिला चेंडू निर्धाव
१६.६ – कार्तिकला टाकलेला दुसरा चेंडूही निर्धाव

या षटकामध्ये खानने केवळ दोन धावा देत एक महत्वाचा गडी बाद केला. तीन ओव्हर शिल्लक राहिलेल्या असताना कोलकात्याला विजयासाठी १८ चेंडूंमध्ये ११ धावांची गरज होती. १८ वे षटक कागिसो रबाडाने टाकले. त्यामध्ये काय घडलं पाहूयात…

१७.१ – त्रिपाठीला एकही धाव काढता आली नाही.
१७.२ – षटकामधील दुसरा चेंडूही निर्धाव गेला.
१७.३ – सलग तिसऱ्या चेंडूवरही त्रिपाठीला धाव घेण्यात अपयश.
१७.४ – चौथ्या चेंडूवरही फटका मारण्याच्या नादात त्रिपाठीने थेट कव्हरच्या खेळाडूकडे चेंडू टोलवला. चौथा चेंडू निर्धाव.
१७.५ – पाचव्या चेंडूवर षटकातील पहिली धाव काढण्यात यश.
१७.६ – षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिक बोल्ड. तीन चेंडूंमध्ये कार्तिकला एकही धाव काढता आली नाही.

रबाडाने या षटकात एक धाव देत एक विकेट काढली. आता कोलकात्याला १२ चेंडूंमध्ये १० धावांची गरज होती. सहा विकेट्स त्यांच्या हाती होत्या. शेवटून दुसरे षटक म्हणजेच १९ वे षटक हे आनरिख नॉर्किएने टाकले. त्यात काय घडलं पाहूयात…

१८.१ – नॉर्किएच्या पहिल्याच चेंडूवर त्रिपाठीने दोन धावा काढल्या. आता समिकरण ११ चेंडूंमध्ये ८ धावा असं झालं.
१८.२ – निर्धाव चेंडू
१८.३ – त्रिपाठीने एक धाव काढल्याने कर्णधार मॉर्गन फलंदाजीला आला. ९ चेंडूंमध्ये सात धावा कोलकात्याला विजयासाठी हव्या होत्या.
१८.४ – निर्धाव चेंडू
१८.५- निर्धाव चेंडू, आता सात चेंडूंमध्ये आठ धावा असं समिकरण
१८.६- मर्गन बोल्ड झाला आणि कोलकात्याचा पाचवा खेळाडू तंबूत परतला. तीन चेंडूत मॉर्गनला एकही धाव करता आली नाही.

शेवटच्या षटकामध्ये कोलकात्याला विजयासाठी सहा चेंडूमध्ये सात धावा हव्या होत्या आणि हाती पाच विकेट्स होत्या. शेवटचं षटक फिरकीपटू आर. अश्विनने टाकलं. त्यात काय घडलं पाहूयात…

१९.१ – त्रिपाठीने पहिल्याच चेंडूवर एक धाव काढली.
१९.२ – शाकिब अल हसनने स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. चेंडू निर्धाव गेला. विजयासाठीचं समीकरण चार चेंडूत सहा धावा असं झालं.
१९.३- शाकिब बोल्ड झाला.
१९.४- शाकिबनंतर पुढच्याच चेंडूवर सुनील नरिनने षटकार मारुन सामना संपवण्याच्या नादा उंच फटका लगावला. मात्र तो लाँग ऑफला असणाऱ्या पटेलने अचूक झेलला. चेंडू हवेत असतानाच त्रिपाठी आणि नरिनने क्रिझ क्रॉस केल्याने त्रिपाठी फलंदाजीला आला. आता दोन चेंडूमध्ये सहा धावा आवश्यक होता.
१९.५ – त्रिपाठीने थेट अश्विनच्यावरुन उंच षटकार लगावत कोलकात्याला सामना जिंकून दिला.

कोलकात्याच्या या विजयामुळे दिल्लीचे पहिल्यांदा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा भंगले.