KKR vs DC : कोलकातानं ‘दिल्ली’ जिंकली; ३ गडी राखून मिळवला विजय

कोलकाताकडून नितीश राणानं नाबाद ३६ धावांची खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिलं

IPL 2021 Kolkata Knight Riders vs Delhi Capitals match report
दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल २०२१च्या ४१ सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला ३ गड्यांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकलेल्या कोलकाताने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शारजाहच्या मैदानावर रंगत असलेल्या या सामन्यात दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. पृथ्वीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि कप्तान ऋषभ पंतने प्रत्येकी ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने आपले सात फलंदाज गमावले पण नितीश राणाच्या नाबाद ३६ आणि सुनील नरिनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर त्यांनी हा विजय आपल्या नावावर केला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत १० गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

कोलकाताचा डाव

दिल्लीच्या १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. फॉर्मात असलेला कोलकाताचा सलामीवीर वेंकटेश अय्यर (१४) ललित यादवच्या फिरकीवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर आलेला कोलकाताचा दुसरा फॉ़र्मात असलेला फलंदाज राहुल त्रिपाठीने ललितला षटकार ठोकत आपल्या डावाची उत्तम सुरुवात केली. पण पुढच्याच षटकात तो आवेश खानचा बळी ठरला. त्याला फक्त ९ धावा करता आल्या. पॉवरप्लेमध्ये कोलकाताने २ बाद ४४ धावा केल्या. अय्यर आणि त्रिपाठी बाद झाल्यानंतर कोलकाताचा वेग थोडा मंदावला. १० षटकात कोलकाताला २ बाद ६७ धावांपर्यंत मजल मारता आली. ११ व्या षटकात एकही धाव न देता रबाडा ने शुभमन गिल ला बाद केले. श्रेयस अय्यरने झेल घेतला. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या अश्विनने मॉर्गनला शून्यावर बाद केले. ललित यादवने मॉर्गनचा झेल घेतला. आतापर्यंत कोलकाताचे ४ फलंदाज तंबूत परतले आहेत. १२ षटकात ४ बाद ६९ अशी धावसंख्या आहे. १४ षटकानंतर कोलकाताची धावसंख्या ९६ धावा ४ बाद अशी आहे. सध्या दिनेश कार्तिक १२ आणि नितेश राणा २९ धावांवर खेळत आहे. विजयासाठी कोलकाताला ३६ चेंडूत ३२ धावांची आवश्यकता आहे. १५ व्या षटकात चौथ्या चेंडूवर आवेश खानने कार्तिकला बोल्ड केले. १६ व्या षटकानंतर कोलकाताची धावसंख्या ११९, ५ बाद अशी आहे. विजयासाठी कोलकाताला २४ चेंडूत ९ धावांची गरज आहे. सुनील नरिन आणि नितेश राणा यांच्या धुव्वाधार फलंदाजीने सामना पालटला. सुनील नरिन २१ धावांवर बाद झाला. नॉर्टजेने त्याला बाद केले. त्यानंतर नितेश राणाला साथ देण्यासाठी आलेला साऊदी ३ धावा करुन तंबूत परतला. आवेश खान ने त्याला बोल्ड केले. त्यानंतर नितेश राणाने जिंकण्यासाठी २ धावांची गरज असतांना चौकार लगावत ३ गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला.

दिल्लीचा डाव

पृथ्वी नसल्यामुळे शिखर धवनसोबत स्टीव्ह स्मिथने सलामी दिली. चांगल्या लयीत खेळणाऱ्या धवनला लॉकी फर्ग्युसनने पाचव्या षटकात झेलबाद केले. धवनने स्मिथसोबत ३५ धावांची सलामी दिली. धवनने आपल्या २४ धावांच्या खेळीत ५ चौकार ठोकले. त्यानंतर आलेला मुंबईकर श्रेयस अय्यर पुढच्याच षटकात सुनील नरिनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. १३व्या षटकात स्मिथला फर्ग्युसनने माघारी धाडले. स्मिथने ३९ धावा केल्या. आपल्या फलंदाजीने चमत्कार करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने गोलंदाजीमध्येही चमत्कार केला. १४ व्या षटकात शिमरॉन हेटमायरला बाद करून त्याने आयपीएलची पहिली विकेट मिळवली. हेटमायरला अय्यरने टिम साऊदीच्या चेंडूवर झेलबाद केले. ललित यादवला बाद करत सुनील नरेनने केकेआरला पाचवे यश मिळवून दिले. त्यानंतर अय्यरने पुन्हा गोलंदाजीला येत अक्षर पटेलला शून्यावर माघारी धाडले. शतकी पल्ला गाठण्याआधीच दिल्लीने ९२ धावांवर आपले सहा फलंदाज गमावले. १७व्या षटकात पंत-अश्विनने संघाचे शतक फलकावर लावले.शेवटच्या षटकात साऊदीच्या गोलंदाजीवर हे दोघे माघारी परतले. ऋषभ पंतने ३९ धावा केल्या. लॉकी फर्ग्युसन, वेंकटेश अय्यर आणि सुनील नरिन यांनी केकेआरसाठी प्रत्येकी २ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स – शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, टिम साउदी, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि लॉकी फर्ग्युसन.

दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया, आवेश खान.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2021 kolkata knight riders vs delhi capitals match report adn

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी