शारजा : युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत आठ विजयांसह बाद फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी होणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीचे पारडे जड मानले जात आहे.

दिल्लीने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सला धूळ चारली. कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्किए या दक्षिण आफ्रिकन वेगवान जोडीपुढे अनेक नामांकित फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्याशिवाय मुंबईकर श्रेयस अय्यरचे पुनरागमन दिल्लीसाठी लाभदायी ठरले आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्याकडून दिल्लीला पुन्हा उत्तम सलामीची अपेक्षा आहे. कोलकाताला नमवून सलग तिसऱ्या हंगामात बाद फेरी गाठण्याची दिल्लीला संधी आहे.

जायबंदी आंद्रे रसेलच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम असल्याने कोलकाताच्या चिंतेत भर पडली आहे. १० सामन्यांतील चार विजयांचे आठ गुण नावावर असलेल्या कोलकाताला गेल्या लढतीत चेन्नईने अखेरच्या चेंडूवर नमवले. व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्यावर कोलकाताची प्रामुख्याने मदार असून सुनील नरिन आणि वरुण चक्रवर्ती यांची फिरकी जोडी त्यांच्यासाठी सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे सीमारेषेच्या दृष्टीने जवळ मात्र फिरकीपटूंसाठी पोषक अशा शारजाच्या खेळपट्टीवर कोलकाताचे फिरकीपटू विरुद्ध दिल्लीचे तडाखेबाज फलंदाज असे द्वंद्व पाहायला मिळू शकते.

’ वेळ : दुपारी ३.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी