आयपीएल २०२१मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) रविवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धूळ चारली. यंदाच्या हंगामात बंगळुरूचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. यूएई टप्प्याची सुरुवात त्यांनी पराभवाने केली असली, तरी कमबॅकही जबरदस्त केले आहे. असे असले तरी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आरसीबीला ‘अपरिपक्व संघ’ म्हटले आहे.

मायकेल वॉनने आरसीबी फ्रेंचायझीच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वॉन म्हणाला, ”मी तुम्हाला प्रामाणिकपणे आरसीबीबद्दल सांगेन, मला काहीही बोलायचे नाही पण मला त्यांची मानसिकता अजिबात आवडत नाही. जर कोणी नवव्या षटकात षटकार मारला आणि तुम्ही मुठी बांधून आनंद साजरा करत असाल, तर ते मला आवडत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारणे हे तुमचे काम आहे. जेव्हा तुम्ही सामना जिंकता तेव्हा तुम्ही खुलेपणाने आनंद साजरा करता. मी आरसीबी टीमला चुकीच्या वेळी उत्साहित होताना पाहिले आहे.”

मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा फलंदाज केएस भरतने ९व्या षटकात राहुल चहरला षटकार खेचला. या षटकारानंतर भरतने सेलिब्रेशन केले. विराटनेही त्याला प्रोत्साहन दिले. मात्र पुढच्याच चेंडूवर राहुलने त्याला माघारी धाडत दमदार प्रत्युत्तर दिले. या सेलिब्रेशनवर वॉनने टीका केली.

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकप फायनलसाठी घेण्यात येणार ‘मोठा’ निर्णय?; BCCI करतंय जोरदार तयारी

टीका करताना वॉन म्हणाला, ”आरसीबीमध्ये ‘परिपक्वता’ नाही. ९व्या षटकात कोणी षटकार मारल्याचा आनंद साजरा करणारा हा एक अतिशय अपरिपक्व गट आहे.” मुंबईविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ १८.१ षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला.