पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन संघांमध्ये आज आयपीएलच्या १४व्या हंगामाचा २७वा सामना रंगणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ आणि महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने असतील. फुटबॉलच्या धर्तीवर आयपीएलमधील मुंबई-चेन्नई यांच्यातील सामन्याला एल-क्लासिको म्हटले जाते, कारण हे दोन्ही संघ लीगमधील सर्वात बळकट आणि चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करणारे संघ आहेत.

गेल्या काही काळापासून मुंबईचा संघ चेन्नईपेक्षा वरचढ असल्याचे समोर आले आहे, मात्र यंदा चेन्नई सुसाट असून सध्या ते गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहेत. त्यांनी ६ पैकी ५ सामने खिशात टाकले आहेत, तर मुंबईचा संघ ६ पैकी ३ सामन्यांत विजय मिळवून चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे चेन्नईला लगाम घालण्याचे आव्हान मुंबईपुढे असेल.

चहर विरुद्ध चहर

आजच्या सामन्यातून दोन भाऊ एकमेकांसमोर येणार आहेत. मुंबई इंडियन्सकडून राहुल चहर, तर चेन्नई सुपर किंग्जकडून दीपक चहर आमनेसामने असतील. राहुलने यंदाच्या मोसमात जबरदस्त कामगिरी करत ६ सामन्यात १४ बळी घेतले आहेत, तर दीपकने ६ सामन्यात ८ बळी घेतले आहेत.

आकडेवारी

आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण ३० सामने खेळले गेले आहेत. यात मुंबई इंडियन्सने १८ तर सीएसकेने १२ सामने जिंकले आहेत.

संभाव्य प्लेईंग XI

मुंबई इंडियन्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, ईशान किशन / नॅथन कुल्टर नाईल, जयंत यादव, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्ज – फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लुंगी एनगिडी.