बाद फेरीतील शर्यतीत टिकून राहण्यासाठी आज पंजाबविरुद्ध विजय आवश्यक

अबू धाबी : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने मंगळवारी होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्जला नमवणे अत्यंत गरजेचे आहे.

‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाल्यापासून मुंबईने सलग तीन सामने गमावले आहेत. १० लढतींतून चार विजयांच्या अवघ्या आठ गुणांसह मुंबई गुणतालिकेत सध्या सातव्या स्थानी आहे. पंजाबच्याही नावावर १० सामन्यांत तितकेच गुण असून सरस निव्वळ धावगतीमुळे ते मुंबईपेक्षा वरच्या स्थानी आहेत.

रोहितवर अतिरिक्त दडपण

बेंगळूरुविरुद्ध मुंबईची फलंदाजी ढेपाळल्याने त्यांना निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित आणि क्विंटन डीकॉक यांची सलामी जोडी सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. मात्र सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक आणि कृणाल पंडय़ा यांचे अपयश मुंबईला महागात पडत आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराने गेल्या तीन सामन्यांत आठ बळी मिळवले आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी मुंबईतील सहा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या खेळाडूंनी विश्वचषकापूर्वी लय मिळवणे अत्यावश्यक आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)