या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आणि सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ संध्याकाळी साडेसात वाजता दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आमनेसामने असतील. गुणतालिकेच पंजाब सातव्या तर राजस्थान सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजयाने सुरुवात करावी लागेल.

आयपीएलच्या इतिहासात एकूण २२ वेळा पंजाब आणि राजस्थान आमनेसामने आले आहेत. यात पंजाबने १० वेळा तर राजस्थानने १२ वेळा विजय मिळवला आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अटीतटीच्या सामन्यात पंजाबने राजस्थानला मात दिली होती.

पंजाब किंग्जबद्दल बोलायचे झाले तर संघाची प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित आहे. ख्रिस गेलला संधी द्यायची की फॉर्ममधील एडन मार्करामला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करायचे याविषयी मतभेद होऊ शकतात. निकोलस पूरन, आदिल रशीद, नॅथन एलिस वगळता मार्कराम आणि गेलपैकी एक विदेशी खेळाडू आज खेळताना दिसू शकतो.

हेही वाचा – “विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत

दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांच्याकडे जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरसारखे खेळाडू नाहीत. अशा परिस्थितीत, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ सलामीवीर म्हणून एविन लुईसला संधी देईल, तर लियाम लिव्हिंगस्टोनला अष्टपैलू म्हणून आणि ख्रिस मॉरिस आणि तबरेज शम्सीला गोलंदाज म्हणून आज खेळवण्यात येऊ शकते.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

पंजाब किंग्ज – केएल राहुल (कप्तान आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल/एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, शाहरुख खान, आदिल रशीद, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस आणि मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स – एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), रियान पराग, शिवम दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकारिया, कार्तिक त्यागी आणि तबरेज शम्सी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 pbks vs rr know with which probable playing xi punjab and rajasthan team can play adn
First published on: 21-09-2021 at 15:15 IST