शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शारजाहच्या संथ खेळपट्टीवर रंगलेल्या या रंगतदार सामन्यात कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा परिणाम आणि कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीला २० षटकात ५ बाद १३५ धावा करता आल्या. प्रत्त्युत्तरात सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशादायक कामगिरी करत थोडी धाकधूक वाढवली. २ चेंडूत ६ धावांची गरज असताना भरवशाचा फलंदाज राहुल त्रिपाठीने षटकार ठोकत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या व्यंकटेश अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आयपीएल २०२१चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार आहे.

कोलकाताचा डाव

शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकातासाठी जबरदस्त सुरुवात केली. संथ खेळपट्टीवर कोणताही दबाव न घेता व्यंकटेश अय्यरने आपला आक्रमक पवित्रा कायम राखला. १२व्या षटकात अय्यरने आपले आयपीएलमधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने रबाडा, नॉर्किया, अश्विनला खंबीर सोमोरे जात कोलकाताला सुस्थितीत पोहोचवले. संघाचे शतक फलकावर लावण्याअगोदर अय्यर झेलबाद झाला. त्याने गिलसोबत ९६ धावांची दमदार सलामी दिली. अय्यरने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. त्यानंतर आलेला नितीश राणा कोलकाताला विजयासाठी १३ धावांची गरज असताना माघारी परतला. पुढच्या षटकात शुबमनही माघारी परतला. त्याने ४६ धावा केल्या. यानंतर कोलकाताने पाच धावांत चार फलंदाज गमावले. २०व्या षटकात अश्विनने शाकिब अल हसन आणि सुनील नरिनला माघारी पाठवले. तो हॅट्ट्रिकवर असताना कोलकाताला विजयासाठी २ चेंडूत ६ धावांची गरज होती, परंतू राहुल त्रिपाठीने त्याला षटकार खेचत कोलकाताला अंतिम सामन्यात पोहोचवले. दिल्लीकडून नॉर्किया, अश्विन आणि रबाडाने प्रत्येकी २ बळी घेतले.

हेही वाचा – मोठी बातमी..! टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात बदल; मुंबईकर क्रिकेटपटूला मिळालं स्थान

दिल्लीचा डाव

दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी सलामी दिली. कोलकाताविरुद्ध चांगली आकडेवारी असणाऱ्या पृथ्वीने चांगली सुरुवात केली होती, पण पाचव्या षटकात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने गोलंदाजीला येत त्याला पायचित पकडले. पृथ्वीला २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या. आठव्या षटकात धवनसोबत मार्कस स्टॉइनिसने दिल्लीचे अर्धशतक पूर्ण केले. शारजाहच्या संथ खेळपट्टीवर दिल्लीला आपला वेग वाढवता आला नाही. १० षटकात दिल्लीने १ बाद ६५ धावा केल्या. १२व्या षटकात वेगवान गोलंदाज शिवम मावीने स्टॉइनिसची दांडी गुल केली. अडखळत सुरुवात केलेल्या स्टॉइनिसने २२ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर धवनने चक्रवर्तीला मोठा फटका खेळण्याच्या नादात शाकिबकडे झेल दिला. धवनने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या. शतक पूर्ण होण्याच्या आधीच दिल्लीने आपला पाचवा गडी शिमरोन हेटमायरच्या रुपात गमावला होता, पण वरुण चक्रवर्तीचा चेंडू नोबॉल ठरला. पण या जीवदानाचा हेटमायरला फायदा उचलता आला नाही. १९व्या षटकात हेटमायर धावबाद झाला. शेवटच्या षटकात श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने शिवम मावीला १५ धावा कुटल्या. दिल्लीने २० षटकात ५ बाद १३५ धावा केल्या. अय्यरने नाबाद ३० धावा केल्या.

Live Updates
23:18 (IST) 13 Oct 2021
कोलकाता फायनलमध्ये!

विजयासाठी २ चेंडूत ६ धावांची गरज असताना राहुल त्रिपाठीने अश्विनला षटकार ठोकत कोलकाताला ३ गडी राखून विजय मिळवून दिला. आता आयपीएल २०२१चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार आहे.

23:11 (IST) 13 Oct 2021
शाकिब-नरिन माघारी

शेवटच्या षटकात अश्विनने शाकिबला पायचीत पकडले. दिल्लीला विजयासाठी ३ चेंडूत ६ धावांची गरज आहे. पुढच्या चेंडूवर अश्विनने सुनील नरिनला झेलबाद केले.

23:07 (IST) 13 Oct 2021
ईऑन मॉर्गनही माघारी

नॉर्कियाने १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनला तंबूत पाठवत प्रतिस्पर्ध्यांवर दबावप आणला. शेवटच्या षटकात कोलकाताला ७ धावांची गरज असून शाकिब अल हसन आणि राहुल त्रिपाठी मैदानात आहेत.

23:00 (IST) 13 Oct 2021
सामन्यात रंगत

१८व्या षटकात रबाडाने सामन्यात रंगत निर्माण केली. त्याने ५ चेंडू निर्धाव टाकले. त्यापैकी एका चेंडूवर त्याने कार्तिकचा त्रिफळा उडवला. १८ षटकात कोलकाताने ४ बाद १२६ धावा केल्या.

22:48 (IST) 13 Oct 2021
राणा-शुबमन माघारी

विजयासाठी १३ धावांची गरज असताना नितीश राणा माघारी परतला. पुढच्या षटकात शुबमनही माघारी परतला. त्याने ४६ धावा केल्या.

22:38 (IST) 13 Oct 2021
राणाला जीवदान

१५व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर अश्विनने राणाचा सोपा झेल सोडला.

22:37 (IST) 13 Oct 2021
कोलकाताचे शतक

१४व्या षटकात कोलकाताने शतक फलकावर लावले. १४ षटकात कोलकाताने १ बाद १०८ धावा केल्या.

22:29 (IST) 13 Oct 2021
कोलकाताला पहिला धक्का

संघाचे शतक फलकावर लावण्याअगोदर अय्यर झेलबाद झाला. १३व्या षटकात रबाडाने त्याला बाद केले. अय्यरने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. अय्यरनंतर नितीश राणा मैदानात आला आहे. १३ षटकात कोलकाताने १ बाद ९८ धावा केल्या.

22:26 (IST) 13 Oct 2021
अय्यरचे अर्धशतक

१२व्या षटकात अय्यरने आपले आयपीएलमधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने रबाडा, नॉर्किया, अश्विनला खंबीर सोमोरे जात कोलकाताला सुस्थितीत पोहोचवले.

22:18 (IST) 13 Oct 2021
१० षटकात कोलकाता

संथ खेळपट्टीवर कोणताही दबाव न घेता व्यंकटेश अय्यरने आपला आक्रमक पवित्रा कायम राखला. १० षटकात कोलकाताने बिनबाद ७६ धावा केल्या.

21:56 (IST) 13 Oct 2021
कोलकाताचे अर्धशतक

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कोलकाताने अर्धशतक पूर्ण केले. ६ षटकात कोलकाताने बिनबाद ५१ धावा केल्या.

21:51 (IST) 13 Oct 2021
व्यंकटेश अय्यरला जीवदान

आक्रमक झालेल्या व्यंकटेश अय्यरला ५व्या षटकात जीवदान मिळाले. दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने त्याचा स्वत: च्या गोलंदाजीवर झेल सोडला. ५ षटकात कोलकाताने बिनबाद ४२ धावा केल्या.

21:30 (IST) 13 Oct 2021
कोलकाताच्या फलंदाजीला सुरुवात

शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकातासाठी सलामी दिली.

21:16 (IST) 13 Oct 2021
दिल्लीचे कोलकाताला १३६ धावांचे आव्हान

शेवटच्या षटकात श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने शिवम मावीला १५ धावा कुटल्या. दिल्लीने २० षटकात ५ बाद १३५ धावा केल्या. अय्यरने नाबाद ३० धावा केल्या.

21:06 (IST) 13 Oct 2021
दिल्लीचा अर्धा संघ गारद

१९व्या षटकात हेटमायर धावबाद झाला. त्याने १७ धावा केल्या.

21:00 (IST) 13 Oct 2021
दिल्लीचं शतक पूर्ण

१८व्या षटकात दिल्लीने शतक पूर्ण केले. १८ षटकात दिल्लीने ४ बाद ११४ धावा केल्या.

20:55 (IST) 13 Oct 2021
हेटमायरला जीवदान

शतक पूर्ण होण्याच्या आधीच दिल्लीने आपला पाचवा गडी शिमरोन हेटमायरच्या रुपात गमावला होता, पण वरुण चक्रवर्तीचा चेंडू नोबॉल ठरला.

20:45 (IST) 13 Oct 2021
दिल्लीला अजून एक धक्का

१६व्या षटकात वेगवान गोलंदाज फर्ग्युसनने पंतला (६) झेलबाद केले.

20:38 (IST) 13 Oct 2021
धवन बाद

संथ खेळणाऱ्या धवनने चक्रवर्तीला मोठा फटका खेळण्याच्या नादात शाकिबकडे झेल दिला. धवनने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या. धवननंतर दिल्लीचा कप्तान मैदानात आला आहे. १५ षटकात दिल्लीने ३ बाद ९० धावा केल्या.

20:25 (IST) 13 Oct 2021
दिल्लीला दुसरा धक्का

१२व्या षटकात वेगवान गोलंदाज शिवम मावीने स्टॉइनिसची दांडी गुल केली. अडखळत सुरुवात केलेल्या स्टॉइनिसने २२ चेंडूत १८ धावा केल्या. श्रेयस अय्यर मैदानात आला आहे. १२ षटकात दिल्लीने २ बाद ७३ धावा केल्या.

20:16 (IST) 13 Oct 2021
दिल्लीची संयमी खेळी

कोलकाताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत धवन-स्टॉइनिसला १० षटकांपर्यंत हात खोलू दिले नाहीत. १० षटकात दिल्लीने १ बाद ६५ धावा केल्या.

20:00 (IST) 13 Oct 2021
दिल्लीचं अर्धशतक

आठव्या षटकात धवन-स्टॉइनिसने दिल्लीचे अर्धशतक पूर्ण केले.

19:55 (IST) 13 Oct 2021
पॉवरप्लेपर्यंत दिल्ली

पहिल्या पॉवरप्लेच्या ६ षटकात दिल्लीने १ बाद ३८ धावा केल्या.

19:48 (IST) 13 Oct 2021
दिल्लीला पहिला धक्का

कोलकाताविरुद्ध चांगली आकडेवारी असणाऱ्या पृथ्वीने चांगली सुरुवात केली होती, पण पाचव्या षटकात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने गोलंदाजीला येत त्याला पायचित पकडले. पृथ्वीला २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या. पृथ्वीनंतर मार्कस स्टॉइनिस मैदानात आला आहे. ५ षटकात दिल्लीने १ बाद ३४ धावा केल्या.

19:29 (IST) 13 Oct 2021
सामन्याला सुरुवात

दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी सलामी दिली, तर कोलकाताकडून शाकिब अल हसन पहिले षटक टाकत आहे.

19:04 (IST) 13 Oct 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स - ऋषभ पंत (कप्तान आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, मार्कस स्‍टॉइनिस, आवेश खान, एनरिक नॉर्किया.

कोलकाता नाइट रायडर्स - ईऑन मॉर्गन (कप्तान), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, सुनील नरिन, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

19:03 (IST) 13 Oct 2021
कोलकातानं जिंकली नाणेफेक

आजच्या सामन्यात कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

18:08 (IST) 13 Oct 2021
कोलकाताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

ईऑन मॉर्गन (कप्तान), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन/आंद्रे रसेल, सुनील नरिन, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

18:07 (IST) 13 Oct 2021
दिल्लीची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

ऋषभ पंत (कप्तान आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, टॉम करन/मार्कस स्‍टॉइनिस, आवेश खान, एनरिक नॉर्किया.

18:06 (IST) 13 Oct 2021
सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

वेळ : सायं. ७.३० वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)

18:06 (IST) 13 Oct 2021
हेड-टू-हेड

केकेआरने आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध खेळलेल्या २९ पैकी १५ सामने जिंकले आहेत, तर दिल्लीला १३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. एका सामन्याचा निकालच लागलेला नाही. मात्र दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतसाठी समाधानाची बाब ही आहे, की मागील पाच वेळेपैकी तीन वेळा दिल्लीने केकेआरला पराभूत केले आहे. यंदा शारजाहमध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात प्रत्येकी एक विजय मिळवला.

18:04 (IST) 13 Oct 2021
मागील सामन्यात काय घडलं?

दिल्लीने २० गुणांसह लीग स्टेजमध्ये अव्वल स्थान मिळवले होते परंतु पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईकडून त्यांचा पराभव झाला. चेन्नईने दिल्लीचा ४ गडी राखून पराभव करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीने क्वालिफायर-१ मध्ये ५ बाद १७२ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून चेन्नईने ६ बाद १७३ धावा केल्या. दुसरीकडे, कोलकाताने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ४ गडी राखून पराभव करत क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. आरसीबीने निर्धारित २० षटकांत ७ बाद १३८ धावा केल्या होत्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने १९.४ षटकांत ६ गडी गमावून विजय मिळवला.