आयपीएल २०२१ च्या ५१ सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला ८ गडी राखून पराभूत केले. यासह मुंबईने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नाणेफेक गमावलेल्या राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९० धावा करू शकला. मुंबईने ८.२ षटकांत हे लक्ष्य गाठले. सलामीवीर इशान किशन ५० धावांवर नाबाद राहिला. मुंबईचा हा सहावा विजय असून कर्णधार रोहित शर्माने या सामन्यादरम्यान एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

रोहितचा पराक्रम

टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी त्याच्या खात्यात ३९८ षटकार होते. राजस्थानविरुद्ध त्याने १३ चेंडूत २२ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. भारताच्या इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर सुरेश रैना ३२५ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने १०४२ षटकार ठोकले आहेत. १००० पेक्षा जास्त षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

हेही वाचा – MI vs RR : मुंबईचा झटपट विजय; इशान किशनचं तुफानी अर्धशतक

मुंबईचाही विक्रम

मुंबई इंडियन्सने राजस्थानविरुद्धचे लक्ष्य केवळ ८.२ षटकांत पूर्ण केले. आयपीएलमध्ये ७० किंवा अधिक चेंडू शिल्लक असताना दोनदा सामने जिंकणारा मुंबई एकमेव संघ बनला आहे. याआधी २००८ मध्ये संघाने केकेआरला ८७ चेंडू शिल्लक ठेवून पराभूत केले होते. ६७ धावांवर कोलकाता संघ गारद झाला होता, मुंबईने ५.३ षटकांत लक्ष्य गाठले होते.