दुबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला सलग दुसऱ्या हंगामात बाद फेरी गाठण्याची नामी संधी आहे. त्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धूळ चारल्यावर आता इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) बुधवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या लढतीत विजयी सातत्य टिकवण्याचे बेंगळूरुचे लक्ष्य असेल.

बेंगळूरुच्या खात्यात १० सामन्यांत १२ गुण आहेत. उभय संघांत ‘आयपीएल’च्या पूर्वार्धात झालेल्या लढतीत बेंगळूरुनेच देवदत्त पडिक्कलच्या शतकाच्या बळावर राजस्थानचा धुव्वा उडवला होता. त्याशिवाय कोहलीनेसुद्धा गेल्या दोन सामन्यांत अर्धशतके झळकावून अन्य संघांना इशारा दिला आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांची जोडी कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकते. ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत अग्रस्थानी असलेला हर्षल पटेल त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.

दुसरीकडे राजस्थानला मागील दोन सामन्यांत अनुक्रमे दिल्ली आणि हैदराबादने पराभूत केले. त्यामुळे १० सामन्यांतून आठ गुण नावावर असलेल्या राजस्थानने येथून पुढे प्रत्येक लढत जिंकणे अनिवार्य आहे. कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल त्यांच्यासाठी सातत्याने योगदान देत आहे. परंतु मधल्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाज कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरत आहेत. रियान परागऐवजी संघात अन्य खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.

११-१० उभय संघांत आतापर्यंत २४ सामने झाले असून त्यापैकी बेंगळूरुने ११, तर राजस्थानने १० लढतींमध्ये बाजी मारली आहे. तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)