राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसननं कर्णधारपदाला साजेशी अशी खेळत यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक झळकावलं. त्याने ६३ चेंडूत ११९ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीमध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. मात्र त्याची शतकी खेळी व्यर्थ गेली. अवघ्या चार धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला. शेवटच्या चेंडूवर ४ धावा हव्या असताना संजूने उत्तुंग फटका मारला. तेव्हा अनेकाच्या काळजाचा ठोका चुकला. एक वेळ तर अशी आली की, चेंडू सीमेपलीकडे गेला. मात्र दीपक हुड्डाने सीमेवर त्याचा झेल घेतला आणि पंजाबच्या फॅन्सनी सुटकेचा निश्वास सोडला.

संजू सॅमसनचं आतापर्यंतच्या आयपीएलमधलं हे तिसरं शतक आहे. तर कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा पहिला खेळाडू आहे. राजस्थानसाठी आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी अजिंक्य रहाणे (२८१०) आणि शेन वॉटसनने (२३७२).ही कामगिरी केली आहे.

RR vs PBKS : रंगतदार सामन्यात पंजाबची राजस्थानवर 4 धावांनी मात

या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागल्यानंतर संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबकडून लोकेश राहुल, दीपक हुड्डा यांनी वादळी खेळी करत राजस्थानसमोर २० षटकात ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभारला. मात्र संजू सॅमसनच्या झंझावातामुळे त्याने घेतलेला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्यच होता असं म्हणावं लागेल.

VIDEO : राहुलचा राहुलने घेतला जबरदस्त झेल

बेन स्टोक्स शून्यावर बाद झाल्यानंतर पंजाब हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. त्यानंतर मनन वोहरा बाद झाला. संघाची धावसंख्या ७० असताना बटलरही तंबूत परतला. त्यामुळे पंजाबची सामन्यावरील पकड मजबूत झाली होती. मात्र कर्णधार संजू सॅमसनच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु होतं. त्याने शेवटपर्यंत मैदानात तग धरून ठेवला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो विजयश्री खेचून आणण्यासाठी झगडत राहिला. तीन गडी बाद झाले तेव्हा त्याला दुबेने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या १२३ पर्यंत नेली. मात्र अर्शदीपच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना हुड्डाच्या हाती झेल देऊन दुबे बाद झाला. त्यानंतर आलेल्या रियान परागनं आक्रमक खेळी करत ११ चेंडूत २५ धावा केल्या. त्यात त्याने ३ षटकार ठोकले. त्यानंतरही सॅमसननं आपली कर्णधार खेळी तशीच सुरु ठेवली आणि संघाला विजयाचं जवळ आणलं. मात्र अवघ्या ४ धावांनी राजस्थानचा पराभव झाला. मात्र त्याच्या या झुंजार खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.