आयपीएल २०२१ चा ४३वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. यात बंगळुरुने राजस्थानवर ७ गड्यांनी मात करत प्लेऑफच्या दृष्टीने मजबूत पाऊल टाकले. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानला उत्तम सुरुवात मिळवून दिली. पण हे दोघे माघारी परतल्यानंतर राजस्थानला शेवटच्या १२ षटकात ७२ धावा करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतरही राजस्थानचा शेवट कडू ठरला आणि त्यांनी बंगळुरुला १५० धावांचे आव्हान दिले. विराटसेनेकडून शाहबाझ अहमदने राजस्थानच्या मधल्या फळीला धक्का देत दोन गडी टिपले, तर पर्पल कॅप सांभाळणाऱ्या हर्षद पटेलने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात केएस भरतच्या ४४ आणि ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद ५० धावांच्या जोरावर बंगळुरुने हा सामना १८व्या षटकातच खिशात टाकला. सामन्यात २ बळी घेणाऱ्या बंगळुरुच्या यजुर्वेंद्र चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह बंगळुरुच्या खात्यात १४ गुण झाले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत.

बंगळुरुचा डाव

ख्रिस मॉरिसच्या पहिल्या षटकात विराट कोहलीने तीन चौकार ठोकत बंगळुरुसाठी उत्तम सुरुवात केली. तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या गोलंदाजीवर राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने बंगळुरुचा दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कलचा सोपा झेल सोडला. देवदत्त तेव्हा ६ धावांवर खेळत होता. मात्र या जीवदानाचा देवदत्तला फायदा उचलता आला नाही. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मुस्तफिजुरने देवदत्तची (२२) दांडी गुल केली. पॉवरप्लेमध्ये बंगळुरुने १ बाद ५४ धावा केल्या. पुढच्याच षटकात बंगळुरुचा कप्तान चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. रियान परागने त्याला धावबाद केले. विराटने २५ धावा केल्या. त्यानंतर केएस भरत आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सांभाळला. १३व्या षटकात या दोघांनी बंगळुरुचे शतक फलकावर लावले. भरतला अर्धशतकाने हुलकावणी दिली. मुस्तफिजुरने त्याला वैयक्तिक ४४ धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी डाव खेळत १७व्या षटकात ख्रिस मॉरिसची धुलाई केली. त्याने या षटकात २२ धावा चोपत संघाचा विजय सुकर केला. दरम्यान त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मॅक्सवेलने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. १७.१ षटकात बंगळुरूने आव्हान पूर्ण केले.

राजस्थानचा डाव

एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानला आक्रमक सुरुवात मिळवून दिली. या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांनी मारलेल्या षटकारांमुळे तीन वेळा चेंडू नव्याने घ्यावा लागला. पदार्पणवीर गार्टनरच्या दुसऱ्या षटकात लुईसने १८ धावा चोपल्या. पाचव्या षटकात लुईसने हॅट्ट्रिकवीर गोलंदाज हर्षल पटेलला षटकार ठोकत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये राजस्थानने बिनबाद ५६ धावा केल्या. अनुभवी गोलंदाज डॅन ख्रिश्चनने बंगळुरूला पहिले यश मिळवून दिले. त्याने जयस्वालला वैयक्तिक ३१ धावांवर सिराजकरवी झेलबाद केले. लुईस-जयस्वालने पहिल्या गड्यासाठी ७७ धावा केल्या. १०व्या षटकात लुईसने आपले आयपीएलमधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. ११व्या षटकात राजस्थानने शतक पूर्ण केले. पदार्पणवीर गार्टनने लुईसला झेलबाद करत राजस्थानला दुसरा धक्का दिला. लुईसने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. १३व्या षटकात बंगळुरुचा यष्टीरक्षक भरतने फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलच्या गोलंदाजीवर महिपाल लोमरोरला यष्टीचीत करत राजस्थानला तिसरा धक्का दिला. त्यानंतर विराटने शाहबाझ अहमदच्या हातात चेंडू दिला. त्याने फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनला तंबूत धाडत राजस्थानला अडचणीत टाकले. संजूला या सामन्यात फक्त १९ धावा करता आल्या. याच षटकात शाहबाझने राहुल तेवतियालाही बाद करत राजस्थानची कंबर मोडली. राजस्थानने १४ धावांत ४ फलंदाजांना गमावले. त्यानंतरही राजस्थानची घसरगुंडी उडाली. १७व्या षटकात चहलने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद करत राजस्थानला अजून एक धक्का दिला. ख्रिस मॉरिस सोबत खेळणारा रियान परागही हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात बाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हर्षलने मॉरिसलाही तंबूत पाठवले. चांगली सुरुवात मिळूनही राजस्थानला शेवट चांगला करता आला नाही. शेवटच्या चेंडूवर हर्षलने अजून एक यश मिळवले. राजस्थानला २० षटकात ९ बाद १४९ धावांपर्यंत पोहोचता आले.

हेही वाचा – T20 World Cup : पाकिस्तानला ‘जबर’ धक्का! भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘दिग्गज’ खेळाडूला झाला डेंग्यू

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स: एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकारिया, कार्तिक त्यागी, मुस्तफिजुर रहमान.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पद्दीकल, श्रीकर भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, डॅनियल ख्रिश्चन, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि यजुर्वेंद्र चहल.