डावखुरा फलंदाज शिखर धवन आयपीएल २०२१ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ४५ च्या सरासरीने ४५४ धावा केल्या आहेत. तो लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. म्हणजेच तो धवन त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.  धवनने विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दिल्लीकडून खेळताना त्याने आज (मंगळवार) केकेआरविरुद्ध २४ धावा केल्या.

आयपीएलच्या सध्याच्या मोसमाबद्दल बोलायचे झाले तर शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आतापर्यंत ३ अर्धशतके केली आहेत. ९२ धावा ही त्याची सर्वात मोठी धावसंख्या आहे. त्याचा स्ट्राइक रेट १३० आहे. तो टी -20 लीगमध्ये सलग तिसऱ्या सत्रात ५०० धावांच्या जवळ आहे. आयपीएलच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत १८७ सामन्यांमध्ये ३५ च्या सरासरीने ५६५१ धावा केल्या आहेत. २ शतके आणि ४४ अर्धशतके केली आहेत. त्याने १०० पेक्षा जास्त षटकार आणि ६४० पेक्षा जास्त चौकार मारले आहेत.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चालू हंगामातील ९ सामन्यांमध्ये ३६ च्या सरासरीने ३२६ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेट १२९ चा आहे, तर त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने १० सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीने ३०७ धावा केल्या आहेत. स्ट्राइक रेट १२३ आहे आणि त्याने ३ अर्धशतके केली आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की धावा, स्ट्राइक रेट आणि अर्धशतकांच्या बाबतीत धवन दोन्ही अनुभवी खेळाडूंवर भारी आहे. 

 २४ तासाच्या आत ‘ऑरेंज कॅप’वर पुन्हा ताबा

सनरायझर्स हैदराबादने सोमवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा पराभव करून पाच सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित केली. हैदराबादने राजस्थानचा सात गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने ८२ धावा केल्या होत्या. यासह त्याने ऑरेंज कॅप काबीज केली होती. सॅमसनने शिखर धवनकडून ऑरेंज कॅप हिसकावली होती. दरम्यान, आजच्या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा ऑरेंज कॅपवर ताबा मिळवला आहे. अवघ्या २४ तासात आत त्याने ही कॅप सॅमसनकडून हिसकावली.