हैदराबादने बंगळुरूचा ४ धावांनी पराभव केला. आयपीएल २०२१ स्पर्धेत हैदराबादचा हा तिसरा विजय आहे. हैदराबादने बंगळुरुसमोर विजयासाठी १४२ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बंगळुरुने ६ गडी गमवून १३७ धावाच केल्या. या पराभवामुळे टॉप २ राहण्याचं बंगळुरूचं स्वप्न कठीण झालं आहे. बंगळुरूचा डाव बंगळुरूची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार विराट कोहली पहिल्या षटकात बाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अवघ्या ५ धावा करून विराट तंबूत परतला. त्यानंतर डॅन ख्रिश्चियनही कमाल करू शकला नाही. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर केन विलियमसननं त्याचा झेल घेऊन तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर श्रीकर भारतही १२ धावा करू बाद झाला. त्यानंतर चौथ्या गड्यासाठी देवदत्त पडिक्कल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डाव सावरला. ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळी केली. मात्र मॅक्सवेल धावचीत झाल्याने सामन्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलही तंबूत परतला. त्याने ५२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यानंतर सामना बंगळुरूच्या पारड्यात असताा शाहबाज अहमद बाद झाला आणि संघावरील दडपण वाढलं. एबी डिव्हिलियर्सलाही शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून देता आला नाही. हैदराबादचा डाव अभिषेक शर्माच्या रुपाने हैदराबादला पहिला धक्का बसला. १३ धावा करून अभिषेक शर्मा तंबूत परतला. या खेळीत १ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. जेसन रॉय आणि केन विलियमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली. हैदराबादने १० षटकात १ गडी बाद ७६ धावांची खेळी केली. संघाच्या धावा ८४ असताना केन विलियमसन बाद झाला. त्याने २९ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. यात चार चौकारांचा समावेश आहे. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. केन विलियमनस बाद होताच घसरगुंडी सुरु झाली. प्रियम गर्ग १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर जेसन रॉय त्याच षटकात बाद झाल्याने धावगती मंदावली. त्यानंतर मैदानात आलेला अब्दुल समादही साजेशी कामगिरी करू शकला नाही. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. वृद्धिमान साहाही मैदानात तग धरू शकला नाही. १३ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकात जेसन होल्डर बाद झाला. बंगळुरूकडून हर्षल पटेलनं ३ गडी बाद केले. डॅन ख्रिश्चियनने २, तर जॉर्ज गार्टन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्लेईंग इलेव्हनहैदराबाद- केन विलियमसन (कर्णधार), जेसन रॉय, वृद्धिमान साहा, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल सामद, जेसन होल्डर, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, उमरान मलिक बंगळुरु- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, स्रिकर भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅन ख्रिश्चियन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल