आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला काल दिल्लीविरुद्ध ३ विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. नऊ षटकांत चार गडी गमावलेला धोनीचा संघ दुबईच्या खेळपट्टीवर धावा काढण्यासाठी धडपडत होता. अंबाती रायडू ४३ चेंडूत नाबाद ५५ आणि धोनीने (१८ धावा) ६४ चेंडूंत ६० धावांची भागीदारी करून आपल्या संघाचा स्कोअर १३६ पर्यंच नेण्यास मदत केली.  मात्र, धोनी या डावात लयमध्ये दिसला नाही. या १८ धावा करण्यासाठी त्याने २७ चेंडू खेळले. याशिवाय तो त्याच्या डावात एकही चौकार मारू शकला नाही, त्यामुळे धोनीवर सोशल मीडियावर देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या खेळाबाबत वक्तव्य केले आहे. 

स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, “या खेळपट्टीवर धोनी हा एकमेव फलंदाज नव्हता जो धावा काढण्यासाठी धडपडत होता. दुबईतील या संथ विकेटवर स्ट्रोक खेळणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नव्हते. १३६ चा स्कोअर असूनही, आम्ही हा सामना जवळजवळ जिंकला होता. तर तुम्ही विचार करु शकता, ही विकेट किती कठीण असेल. इथे मोठे फटके मारणे अजिबात सोपे नव्हते. डावाच्या अखेरीस दिल्लीला धावा काढण्यासाठीही संघर्ष करावा लागला.

CSK vs DC : शिष्यानं जिंकली गुरुविरुद्धची लढाई; दिल्ली अग्रस्थानी

 “मैदानावर प्रत्येकजण आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही गेल्या पाच दिवसात तीन सामने खेळलो, ज्यासाठी आम्हाला खूप प्रवास करावा लागला. याचा परिणाम सामन्यातही दिसून आला. यादरम्यान आम्ही विकेट घेण्याच्या अनेक सोप्या संधी गमावल्या, जे निराशाजनक होते. दरम्यान, आम्हाला अजूनही गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे आणि पुढील सामन्यात विजय मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असा विश्वास देखील स्टीफन फ्लेमिंग यांनी व्यक्त केला.