दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या पात्रता सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या स्फोटक खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात धोनीने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. लीगमध्ये संथ खेळणाऱ्या धोनीवर सातत्याने टीका होत होती, पण त्याने आपण अजूनही फिनिशर असल्याचे सिद्ध केले. गावसकर म्हणाले, ”धोनीला स्वतःवर खूप आत्मविश्वास होता आणि त्याला सामना संपवायचा होता.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रवींद्र जडेजाच्या आधी धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा सगळेच स्तब्ध झाले. धोनी फॉर्ममध्ये नव्हता शिवाय त्याला लीगमध्ये फार वेगाने धावा करता आल्या नाहीत. दुसरीकडे, जडेजा वेगवान फलंदाजी करण्यात तरबेज झाला आहे. मात्र, धोनीने स्वत: वर विश्वास ठेवला. स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान गावसकर म्हणाले, ”रवींद्र जडेजा सर्वोत्तम पद्धतीने फटकेबाजी करत होता. पण असे असूनही धोनीने स्वत:ला बढती दिली. एक कर्णधार म्हणून त्याला जाऊन सामना संपवायचा होता. त्याला स्वतःला हे काम करायचे होते, जे स्तुत्य आहे. जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तो पुढे आला आणि त्याने त्याच्याच शैलीत सामना संपवला.”

हेही वाचा – IPL 2021: धोनी क्रीजवर जाण्यापूर्वी काय घडले? प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनी सांगितला किस्सा

दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खानच्या षटकात धोनीने जबरदस्त षटकार ठोकला आणि नंतर शेवटच्या षटकात टॉम करनविरुद्ध तीन चौकार मारून सामना संपवला. तो ६ चेंडूत १८ धावांवर नाबाद राहिला.

असा रंगला सामना

ऋतुराज गायकवाड, राॉबिन उथप्पा आणि कप्तान महेंद्रसिंह धोनी यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पाडाव करत आयपीएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुबईच्या मैदानावर प्रेक्षकांना रंगतदार सामना पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कप्तान ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे दिल्लीने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज -रॉबिनने ११० धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगल्या स्तरावर पोहोचवले, परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्तम मारा करत चेन्नईला संकटात टाकले होते. शेवटच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला २ चेंडू राखून विजय मिळवून दिला. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवामुळे आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दिल्लीला अजून एक संधी मिळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 sunil gavaskar hails ms dhoni amazing finish against delhi capitals adn
First published on: 11-10-2021 at 15:23 IST