रॉय, विल्यम्सन यांच्या अर्धशतकांमुळे हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद

दुबई : मोसमातील पहिला सामना खेळणारा जेसन रॉय (६०) आणि कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद ५१) यांनी साकारलेल्या अर्धशतकांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सोमवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मात केली.

राजस्थानने दिलेले १६५ धावांचे आव्हान १८.३ षटकांत पूर्ण करत हैदराबादने मोसमातील केवळ दुसऱ्या विजयाची नोंद केली. ते बाद फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाले असून राजस्थानला आगेकूच करणे या पराभवामुळे अवघड होऊ शकेल.

हैदराबादचे सलामीवीर रॉय आणि वृद्धिमान साहा (१८) यांनी डावाची आक्रमक सुरूवात केली. या दोघांनी पाच षटकांत ५७ धावांची सलामी दिल्यावर साहाला महिपाल लोमरोरने बाद केले. यानंतर रॉयला कर्णधार विल्यम्सनची उत्तम साथ लाभली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचल्यावर रॉय माघारी परतला. युवा प्रियम गर्गला खातेही उघडता आले नाही. मात्र, विल्यम्सन आणि डावखुऱ्या अभिषेक वर्मा (नाबाद २१) यांनी उर्वरित धावा करत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १६७ अशी धावसंख्या उभारली होती. एव्हिन लुईस (६) लवकर माघारी परतल्यावर कर्णधार संजू सॅमसन (८२) आणि मुंबईकर यशस्वी जैस्वाल (३६) यांनी राजस्थानला सावरले. सॅमसनने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ‘ऑरेंज कॅप’ही आपल्या नावे केली. अखेरच्या षटकांत लोमरोरने (नाबाद २९) चांगले योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ५ बाद १६४ (संजू सॅमसन ८२, यशस्वी जैस्वाल ३६,; सिद्धार्थ कौल २/३६) पराभूत वि. सनरायजर्स हैदराबाद : १८.३ षटकांत ३ बाद १६७ (जेसन रॉय ६०, केन विल्यम्सन नाबाद ५१; महिपाल लोमरोर १/२२)