रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात पाऊल ठेवताच नवा विक्रम केला आहे. आयपीएलमधील एका संघासाठी २०० सामने खेळणारा विराट पहिला खेळाडू ठरला. सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आधी अनेक खेळाडूंनी लीगमध्ये २०० सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला एका संघासाठी २०० सामने खेळता आलेले नाहीत. विराट २००८ पासून आरसीबीसोबत आहे. त्याच्या आधी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना आयपीएलमध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा १३३वा सामना आहे. ६० सामन्यांत आरसीबीला विजय, तर ६५ सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. तो टी-२० लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पण त्यांना आतापर्यंत संघाला जेतेपद मिळवता आलेले नाही. चालू हंगामानंतर तो संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषकानंतर तो टीम इंडियाच्या टी-२० संघाचे कर्णधारपदही सोडेल.

कोलकाताचाही हा २०० वा सामना आहे. संघाने १०० सामने जिंकले आहेत, तर ९५ सामन्यात ते पराभूत झाले आहेत. मुंबई इंडियन्सने सर्वाधिक २११ सामने खेळले आहेत. त्याचबरोबर, आरसीबीचा हा २०४ वा सामना आहे. त्यांनी ९४ सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स – इयॉन मॉर्गन (कप्तान), नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरिन, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कप्तान), देवदत्त पडिक्कल, केएस भारत, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, सचिन बेबी, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, काईल जेमिसन आणि यजुर्वेंद्र चहल.