विराट कोहलीने आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीच कर्णधार म्हणून हा त्याचा शेवटचा इंडियन प्रीमियर लीग हंगाम असे घोषित केले होते. याशिवाय विराटने म्हटले आहे की जोपर्यंत तो आयपीएलमध्ये खेळतो तोपर्यंत तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळेल. आरसीबीला एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबी जेतेपद पटकावण्याचे स्वप्नही भंगले. त्यानंतर आरसीबीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात विराट कर्णधारपदाबद्दल आणि आरसीबीसोबतच्या सर्वात संस्मरणीय क्षणांविषयी बोलतो आहे.

‘हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे, कारण मी फ्रँचायझी संघाचे दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. मी संघासाठी जेतेपद पटकावण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले, पण दुर्दैवाने तसे झाले नाही, पण आयुष्य असेच आहे. मला कोणतीही तक्रार नाही, आरसीबीने मला दिलेल्या संधींसाठी मी आभारी आहे. मला आनंद आहे की माझ्या मनात जे काही आहे ते मी संघाला देऊ शकलो. आरसीबीसाठी कर्णधार म्हणून मी जे काही करू शकलो त्याबद्दल मी आनंदी आहे असे विराटने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

विराटने यावेळी आरसीबीसोबतच्या सर्वात संस्मरणीय क्षणाबद्दल भाष्य केले आहे. “जेव्हा तुम्ही बसता, तेव्हा तुम्ही त्या सामन्यांचा विचार करता ज्यात तुम्ही जोरदार पुनरागम केले होते. ज्या सामन्यांमध्ये आम्ही खडतर परिस्थितीतून परतलो आणि जिंकलो आणि प्लेऑफमध्ये पोहोचलो, विशेषत: बंगळुरूमध्ये खेळलेले सामने, जे आम्ही जिंकले. कर्णधार म्हणून, जेव्हा तुम्ही खेळाडूंवर विश्वास ठेवता की ते परत येतील आणि सामने जिंकतील, ही सर्वात आश्चर्यकारक भावना आहे. मला माझ्या चाहत्यांचा पाठिंबा मिळत नाही असे मला कधी वाटले नाही.”

“सर्व प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ अगदी वरच्या व्यवस्थापनानेही मला पूर्ण पाठिंबा दिला. आम्ही ट्रॉफी जिंकू शकलो नसतानाही वरिष्ठ व्यवस्थापनाकडून कधीही दबाव जाणवला नाही. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की या फ्रँचायझीशी माझी निष्ठा पूर्णपणे वेगळी आहे,” असे विराटने म्हटले आहे.

दरम्यान, आयपीएल २०२१ स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान संपुष्टात आलं. यानंतर विराट संघाचं नेतृत्व करणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

“आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. मात्र कोलकात्याच्या फिरकीपटूंनी मधली षटकं चांगली टाकली. त्यांनी चांगल्या गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन केलं आणि गडी बाद करत राहिले. पुढील फेरीत जाण्यासाठी ते पूर्णपणे पात्र आहेत. मधल्या एका षटकात २२ धावा आल्याने आमची संधी कमी झाली होती. तरी आम्ही शेवटच्या षटकापर्यंत लढा दिला. सुनील नरिन एक चांगला गोलंदाज आहे. त्याने हे पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे.” असं कोलकात्याचं कौतुक करताना विराट कोहलीने सांगितलं.