आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा प्रवास अत्यंत निराशाजनक राहिला. या संघाने १२ पैकी १० सामने गमावले असून हा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादला रविवारी स्पर्धेत १० वा पराभव स्वीकारावा लागला. कोलकाता नाइट रायडर्सने हैदराबादवर ६ गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघ २० षटकांत ८ गडी गमावून केवळ ११५ धावा करू शकला. मात्र, कोलकातालाही विजयासाठी संघर्ष करावा लागला. पण हैदराबादच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा सर्वांना निराश केले. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने त्यांची तुलना झोपेच्या गोळ्यांशी केली.

सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना ट्रोल करताना सेहवाग म्हणाला, ‘हैदराबादने रॉय आणि साहा यांच्यापासून सुरुवात केली पण दोघेही लवकरच डग-आउटमध्ये परतले. यानंतर, केन विल्यमसन आणि प्रियम गर्गने डाव सांभाळला पण ही खेळपट्टी इतकी संथ होती, की त्यावर धावा काढणे खूप कठीण होत होते. यानंतर अब्दुल समदने तीन षटकार ठोकले आणि २५ धावा केल्यावर तोही बाद झाला. पण यानंतर हैदराबादचे इतर फलंदाज झोपेच्या गोळ्यांसारखे होते. शेवटच्या ४ षटकांत मी झोपी गेलो. जेव्हा मी जागा झालो, तेव्हा मी हैदराबादने २० षटकांत ८ बाद ११५ धावा केल्याचे पाहिले.”

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकप स्टेडियममध्ये बसून पाहायचाय?; ‘अशी’ मिळवा तिकिटे

सनरायझर्स हैदराबाद संघ या मोसमात शेवटच्या स्थानावर राहिला. हैदराबादला या हंगामात त्यांच्या अनुभवी फलंदाजांच्या खराब फॉर्मचा फटका सहन करावा लागला. हैदराबादने हंगामाच्या मध्यभागी प्रथम डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले नाही. वॉर्नर या हंगामात ८ सामन्यांत १९५ धावा करू शकला. केदार जाधव, वृद्धीमान साहा, मनीष पांडे, हे सर्व फलंदाज त्यांच्या प्रतिभेनुसार चांगला खेळ दाखवू शकले नाहीत.