आयपीएल २०२१मध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज दीपक चहरने आपल्या गर्लफ्रेंडला प्रेक्षकांसमोरच प्रपोज केले. सोशल मीडियावर दीपक आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. पण, ही तरुणी नक्की कोण, हा प्रश्न सर्वांच्या मनात उद्भवत आहे.

कोण आहे ती?

दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज आहे. ती अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. सिद्धार्थ बिग बॉस आणि एमटीव्ही शो स्प्लिट व्हिला मध्ये झळकला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. काही वृत्तानुसार, दीपक आणि जया आयपीएल २०२१ नंतर घरी परतताच लग्न करू शकतात. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दीपक चहरने खुलेपणाने चाहत्यांमध्ये आपले प्रेम व्यक्त केले.

सामन्यानंतर बक्षीस वितरण संमारभाच्या आधी दीपक स्टँड्समध्ये गेला, आणि त्याने प्रेक्षकांसमोर जया भारद्वाज हिला प्रपोज केले. दीपकची ही गोष्ट पाहून त्याची गर्लफ्रेंडली खूश झाली आणि तिने दीपकला होकार दिला. दीपकने प्रपोज करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – राहुल…नाम तो सुना होगा! एका सामन्यात पंजाबच्या कप्तानानं दोघांकडून काढून घेतली ऑरेंज कॅप

पंजाबचा चेन्नईवर विजय

आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाबने चेन्नईला ६ गडी आणि ६ षटके राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने पंजाबला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात पंजाबचा कप्तान केएल राहुलने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. या विजयासह पंजाबचे गुणतालिकेत १२ गुण झाले असून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. असे असले तरी साखळी फेरीतील पंजाबचे सर्व सामने संपले असून कोलकाता आणि मुंबई यांचा प्रत्येकी एक सामना उरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी सामना गमवल्यास कोलकाता, मुंबई, राजस्थान आणि पंजाबचे प्रत्येकी १२ गुण होतील आणि धावगतीवर चौथ्या संघाची प्लेऑफमध्ये निवड होईल.