देशातील करोनारुग्णांच्या वाढत्या संख्येनंतरही जैव-सुरक्षित वातावरणात खेळवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर आता टीका होऊ लागली आहे. भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने कुटुंबातील सदस्य करोनाशी झुंजत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘आयपीएल’मधून माघार घेतली आहे. त्यातच ऑस्ट्रेलियातील काही शहरांमध्ये कोणत्याही क्षणी टाळेबंदीची घोषणा होईल आणि आपण भारतातच अडकून बसू, या भीतीपोटी अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी मायदेशी जाणे पसंत केल्याने ‘आयपीएल’च्या संयोजकांचे धाबे दणाणले आहेत. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यानेही ‘आयपीएल’च्या आयोजनावर खरमरीत टीका केल्याने आता जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० लीगवर भयसावट निर्माण झाले आहे. बिंद्राप्रमाणेच क्रिकेटचाहत्यांचीही सारखीच अवस्था आहे. मात्र ज्यांना ‘आयपीएल’मध्ये खेळणे सुरक्षित वाटत नसेल, त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण ‘आयपीएल’चा खेळ सुरूच राहणार, अशी भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतली आहे.

कुटुंबीयांना पाठिंबा देण्यासाठी अश्विनचा न खेळण्याचा निर्णय

चेन्नई : दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ‘आयपीएल’च्या उर्वरित सामन्यांत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईक करोनाशी लढा देत असताना या कठीण काळात त्यांच्याकडे लक्ष देण्याचे अश्विनने ठरवले आहे.

‘‘मंगळवारपासून मी ‘आयपीएल’मधून माघार घेत आहे. माझे कुटुंबीय आणि नातेवाईक करोनाशी झुंज देत असून त्यांना या काळात माझ्या पाठिंब्याची गरज आहे. परिस्थिती सुधारल्यास मी नक्कीच दिल्लीकडून खेळण्यासाठी पुन्हा सज्ज होईन. तूर्तास तरी माझे कुटुंबच महत्त्वाचे आहे,’’ असे सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीनंतर अश्विनने ट्वीट केले.

देशभरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘आयपीएल’मधून माघार घेणारा अश्विन हा भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच अश्विनने देशातील सद्य:स्थितीवर चिंता व्यक्त करणारी चित्रफीत ट्विटरवर पोस्ट केली. त्याशिवाय सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारही मानले होते.

‘आयपीएल’ होणारच

– बीसीसीआय

देशातील वाढती करोनाग्रस्तांची संख्या, भारतासह विदेशातील खेळाडूंनी घेतलेली माघार यामुळे ‘आयपीएल’ स्थगित करण्याच्या मागण्यांनी जोर धरला असला तरी या स्पर्धेचे सामने नियोजनाप्रमाणेच खेळवण्यात येतील, अशी ठाम भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पत्करली आहे. ‘‘आयपीएल आखलेल्या वेळापत्रकानेच सुरू राहील. कोणत्याही खेळाडूला माघार घ्यायची असल्यास त्याला पूर्ण परवानगी आहे. परंतु यामुळे स्पर्धेच्या आयोजनावर काहीही परिणाम होणार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

झम्पा, रिचर्डसनची माघार

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा आणि वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघे ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे प्रतिनिधित्व करतात. रविवारीच राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अ‍ॅण्ड्र्यू टायनेसुद्धा या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियातील पर्थ, सिडनी शहरांत करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, लवकरच टाळेबंदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतामध्येच अडकून राहण्याऐवजी मायदेशी परतण्याच्या हेतूने टायने माघार घेतली. झम्पा आणि रिचर्डसनच्या माघारीमागेसुद्धा हेच कारण असण्याची शक्यता आहे.

भारतात राहणे अधिक सुरक्षेचे -कुल्टर-नाइल

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या नॅथन कुल्टर-नाइलने मात्र भारतात राहणेच अधिक सुरक्षेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. ‘‘प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ऑस्ट्रेलियातील खेळाडू का माघार घेत आहेत, याची मला कल्पना आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आम्हा सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या संपर्कात आहे. परंतु मुंबई इंडियन्ससह जैव-सुरक्षित वातावरणात राहणे मला अधिक सोयीचे आणि सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे मी सध्या तरी माघारी परतण्याचा निर्णय घेतलेला नाही,’’ असे कुल्टर-नाइल म्हणाला.

बिंद्राकडून आयपीएल आयोजनावर टीकास्त्र

नवी दिल्ली : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने देशावर करोनाचे गंभीर संकट ओढवले असतानाही इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाबाबत सवाल उपस्थित केले आहेत. ‘‘क्रिकेटपटू किंवा अधिकारी स्वत:च्या जैव-सुरक्षित वातावरणात आपले जीवन व्यतीत करू शकत नाहीत. तसेच देशात सध्या काय घडते आहे, याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत,’’ अशा शब्दांत बिंद्राने ‘आयपीएल’वर टीकास्त्र सोडले आहे.

देशात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक करोनाचे रुग्ण सापडत असून या विषाणूने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा खूप मोठा तडाखा देशाला बसला आहे. ‘‘क्रिकेटपटू आणि अधिकारी स्वत:च्या जैव-सुरक्षित वातावरणात राहून बाहेर काय सुरू आहे, याबाबत आंधळे आणि बहिरे होऊ शकत नाहीत. तुम्ही स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळत असलात तरी बाहेरून रुग्णवाहिकांच्या रुग्णालयातील फेऱ्या वाढू लागल्या आहेत,’’ अशा शब्दांत बिंद्राने कानउघाडणी केली आहे.

‘‘आयपीएलला किती प्रसिद्धी मिळत आहे, याची मला कल्पना नाही. पण निसर्गाप्रतिची बांधीलकी जपायला हवी. विजयाचा जल्लोष असो किंवा आणखी काही गोष्टी मर्यादित प्रमाणात करायला हव्यात, कारण समाजप्रति आदर दाखवण्याची हीच वेळ आहे. आपण संवेदनशीलपणा दाखवला, तर प्रत्येकाला या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत होईल. ही प्रक्रिया फार सोपी नाही. करोना विषाणूचा संसर्ग उद्या संपणार नाही. हा खेळ कधी संपेल, हे सांगता येत नाही. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक कुटुंबे करोनाने बाधित होत आहेत. त्यामुळे हे पचवणे फार कठीण आहे,’’ अशा शब्दांत बिंद्राने आपल्या भावना व्यक्त केल्या.

नैराश्येमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची माघार -हसी

भारतातील करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यामुळे ‘आयपीएल’मध्ये खेळणारे ऑस्ट्रेलियाचे काही क्रिकेटपटू नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे, असे मत कोलकाता नाइट रायडर्सचा सल्लागार डेव्हिड हसी याने व्यक्त केले. ‘‘भारतातील करोनाबाबतच्या परिस्थितीवर परदेशी खेळाडूंनी निराश होणे स्वाभाविक आहे. आम्ही सर्व जण जैव-सुरक्षित वातावरणात अडकलो आहोत. दर दुसऱ्या दिवशी आमची करोना चाचणी केली जात आहे. प्रत्येकाने आपापल्या सुरक्षेसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. पण निराशेमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या संपर्कातील आणखीन काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायदेशी परततील,’’ असेही हसीने सांगितले.

कमिन्सकडून करोना लढ्यासाठी मदतनिधी

नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्सचा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने रुग्णालयांना प्राणवायूची कमतरता भासू नये, यासाठी पंतप्रधान सहायता निधीत ५० हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपयांची मदत केली आहे. ‘‘खेळाडू या नात्याने आपण लाखो लोकांच्या भल्याकरिता काही तरी नक्कीच करू शकतो. त्यामुळेच रुग्णालयांना प्राणवायू मिळवून देण्याकरिता मी पंतप्रधान सहायता निधीत योगदान देत आहे. करोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळे इंडियन प्रीमियर लीग होईल की नाही, याबाबत चर्वितचर्वण सुरू असले तरी अनेक खेळाडूंनी मदतीसाठी पुढाकार घ्यायला हवा,’’ असे कमिन्सने म्हटले आहे.