इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लखनऊ फ्रेंचायझीने अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) परवानगीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी घोषणा करण्यास मनाई होती. तथापि, काही निर्बंध अजूनही अस्तित्वात आहेत. नव्या प्रशिक्षकाच्या घोषणेनंतर आता कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

लखनऊ फ्रेंचायझीचे मालक संजीव गोयंका म्हणाले, ”खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून अँडीने क्रिकेटच्या इतिहासात आपली छाप सोडली आहे. आम्ही त्याच्या व्यावसायिकतेचा आदर करतो आणि आमच्या दूरदृष्टीसह कार्य करण्यास आणि आमच्या कार्यसंघामध्ये मूल्य जोडण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

हेही वाचा – मस्तच ना..! टीम इंडियासाठी रोहित बनला ‘कोच’; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, “वाह रे हिटमॅन!”

याआधीच्या रिपोर्ट्समध्ये अँडी फ्लॉवर यांचे नाव प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर होते. पंजाब किंग्जचा राजीनामा दिल्यापासून, ते दोन नवीन संघांपैकी एकाचे मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. त्यांच्याशिवाय गॅरी कर्स्टन, डॅनियल व्हिटोरी आणि आशिष नेहरा यांचीही नावे समोर येत होती. मात्र, सर्वांना मागे टाकत अँडी फ्लॉवर यांनी हे स्थान पटकावले आहे.

जुन्या संघांनी आपल्या खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर आता लखनऊ आणि अहमदाबादच्या संघांना खेळाडूंना कायम ठेवावे लागणार आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी ३ नावे कायम ठेवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत पुढे जाण्याची शक्यता आहे.