आयपीएलच्या पुढील हंगामापासून प्रेक्षकांच्या आनंदात वाढ होणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाच्या प्रवेशामुळे सामन्यांची संख्याही वाढणार आहे. तत्पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे या संघांना त्यांचे खेळाडू मिळतील. मुंबईकर क्रिकेटपटू श्रेयस अय्यर, ज्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने २०२०च्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती, तो आता संघ सोडण्याच्या विचारात आहे. वास्तविक अय्यरला संघाचे नेतृत्व करायचे होते. त्यामुळेच त्याला लिलावात उतरायचे आहे.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात दुखापतीमुळे अय्यर बाहेर पडला आणि त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी स्वीकारली. अय्यरने दुसऱ्या टप्प्यात पुनरागमन केले, पण कर्णधारपदही पंतकडेच राहिले. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी केली. दिल्लीने १४ पैकी १० सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, परंतु प्लेऑफमध्ये, संघ क्वालिफायर १ आणि क्वालिफायर २ सामन्यांत पराभूत झाला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अय्यरला संघाचे नेतृत्व करायचे होते आणि या हंगामात पंतच्या उत्कृष्ट नेतृत्वानंतर त्याला दिल्ली कॅपिटल्समध्ये संधी मिळाली नाही. आयपीएल २०२२ मध्ये, अहमदाबाद आणि लखनऊ या नवीन फ्रेचायझी पदार्पण करतील. या दृष्‍टीने अय्यर स्वतःला दिल्लीपासून वेगळे करून लिलावात उतरेल.

हेही वाचा – ‘देशद्रोही’ टीकेनंतर मोहम्मद शमीचं पहिलं ट्वीट; फोटो शेअर करत म्हणाला…

दिल्ली कॅपिटल्ससह अय्यरचा प्रवास २०१५ मध्ये सुरू झाला आणि २०१८ मध्ये गौतम गंभीरने हंगामाच्या मध्यभागी कर्णधारपद सोडल्यानंतर अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. यानंतर अय्यरने उत्कृष्ट पद्धतीने संघाचे नेतृत्व केले आणि दोनदा संघाला प्लेऑफमध्ये नेले. अय्यरच्या नेतृत्वाखाली, दिल्लीने आयपीएल २०२० चा विजेतेपदाचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला.

आयपीएल २०२१ बद्दल बोलायचे तर, अय्यरला मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत खांद्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात खेळू शकला नाही आणि त्यानंतर पंतला दिल्लीचे कर्णधारपद देण्यात आले. पंतने आपले काम चोख बजावले.