इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील म्हणजेच २०२२ च्या पर्वाआधी अनेक संघांनी आपल्या महत्वाच्या खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला संघाने पुन्हा एकदा रिटेन केलं आहे. मात्र महत्वाच्या खेळाडूंना रिटेन करु न शकल्याने रोहित शर्मा नाराज आहे. हे फारच मन दुखावणारं असल्याचं त्याने म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने चार खेळाडूंना रिटेन केलं असून यामध्ये रोहितचा समावेश आहे. रोहितसोहत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि पोलार्डला रिटेन करण्यात आलं आहे. एखादा संघ चारपेक्षा जास्त खेळाडू रिटेन करु शकत नाही.

ज्या खेळाडूंना मुंबई इंडियन्स रिटेन करु शकलं नाही त्यात हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, बोल्ट यांचा सहभाग आहे. मुंबई इंडियन्सच्या यशात या खेळाडूंचा मोलाचा वाटा होता. यावेळचं रिटेन्शन मुंबई इंडियन्ससाठी फारच आव्हानात्मक होतं सांगताना आपल्या महत्वाच्या खेळाडूंना मुक्त करण्याचा निर्णय घेणं फार कठीण होतं असं सांगितलं.

“मुंबई इंडियन्ससाठी हे रिटेन्शन फारच कठीण होतं हे सर्वांना माहिती आहे. आमच्याकडे खूप जबरदस्त खेळाडू होते आणि त्यांना मुक्त करणं आव्हानात्मक निर्णय होता,” असं रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं. मुंबई इंडियन्सने १६ कोटी मोजत रोहित शर्माला रिटेन केलं आहे. रोहित शर्माने कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलं नसलं तरी किशन, पंड्या बंधू आणि बोल्ट यांच्याबद्दल तो बोलत होता हे स्पष्ट आहे.

“त्यांनी संघासाठी खूप मेहनत घेतली असून अनेक आठवणी तयार केल्या आहेत. त्यामुळे त्यांना जाऊ देणं फार अवघड निर्णय होता. आम्ही पुन्हा एकदा ती कोअर टीम तयार करु अशी आशा आहे,” असं रोहितने म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सकडे लिलावात पुन्हा एकदा या खेळाडूंना विकत घेण्याची संधी आहे.

रोहितने सांगितलं की, “चांगला संघ तयार कऱणं याकडे लक्ष्य असून लिलावात याची सुरुवात होईल. लिलावात योग्य खेळाडू मिळावेत यासाठी प्रयत्न असेल”.