scorecardresearch

IPL 2022 Mega Auction : BCCIनं केली मोठी घोषणा; ‘इतक्या’ खेळाडूंवर लागणार बोली!

मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी बंगळुरू येथे होणार आहे,

IPL 2022 Mega Auction know about date time venue and rules
आयपीएल २०२२ मेगा लिलाव

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२च्या मेगा लिलावाशी संबंधित भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. दोन दिवसीय मेगा लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी सादर करण्यात आली आहे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावासाठी १२००हून अधिक क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती, मात्र ५९० क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी बंगळुरू येथे होणार आहे, ज्यामध्ये दहा संघांचे मालक आणि प्रतिनिधी सहभागी होतील.

या खेळाडूंपैकी २२८ कॅप्ड आणि ३५५ अनकॅप्ड आहेत. कॅप्ड म्हणजे ते भारतासाठी किंवा इतर कोणत्याही देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्याच वेळी, अनकॅप्ड खेळाडूंचा अर्थ असा, की त्यांनी भारत किंवा इतर कोणत्याही देशांतर्गत क्रिकेट किंवा लीग क्रिकेट खेळले आहे, परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. या मेगा लिलावात असोसिएट नेशन्सचे ७ आपले नशीब आजमवणार आहेत.

भारताच्या प्रमुख खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, यजुर्वेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव आणि हर्षल पटेल या खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. तर परदेशी खेळाडूंमध्ये फाफ डू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन आणि वानिंदू हसरंगा या खेळाडूंचा समावेश आहे.

यावेळी १० संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ गेल्या काही हंगामांपासून आयपीएल खेळत आहेत, पण आता लखनऊ सुपर जायंट्स आणि अहमदाबादचा संघ आयपीएल खेळणार आहे.

हेही वाचा – VIDEO : पाकिस्तानातही पोहोचली ‘पुष्पा’ची जादू..! स्टार क्रिकेटरनं Srivalli गाण्यावर केला डान्स

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात आता ४८ खेळाडू असे आहेत, ज्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तर २० खेळाडू असे आहेत ज्यांची मूळ किंमत १.५ कोटी आहे. तर १ कोटी मूळ किंमतीसाठी ३४ खेळाडू उपलब्ध असणार आहेत. यश धुल, विकी ओसवाल, राजवर्धन हंगरगेकर हे अंडर-१९ क्रिकेटमधील आणखी काही खेळाडू मेगा लिलावाचा भाग असतील.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 player auction list announced adn

ताज्या बातम्या