इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. राजस्थान रॉयल्सने सात गडी राखून हा सामना आपल्या खिशात घातला आहे. सलामीवीर जोस बटलरच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थानने विजय मिळवत आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामन्यात राजस्थानसमोर गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. येत्या रविवारी म्हणजे २९ मे रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध लढतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा सामना राजस्थान रॉयल्स हा दुसरा क्वॉलिफायर सामना होता. विशेष म्हणजे, पहिल्या क्वॉलिफायरमध्ये राजस्थानला गुजरात टायटन्सकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. तर, आज पराभूत झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वॉलिफायर २ मध्ये धडक मारली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांमध्ये आठ गड्यांच्या बदल्यात १५७ धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी राजस्थानला १५८ धावांचे माफक आव्हान मिळाले होते.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानची सुरुवात जोरदार झाली. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी अवघ्या ४.४ षटकांमध्ये संघाचे अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानला यशस्वी जयस्वालच्या रुपात पहिला झटका बसला आहे. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने झटपट अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसन पुन्हा एकदा वानिंदू हसरंगाच्या जाळ्यात अडकला. हसरंगाने संजूला बाद करण्याची ही या हंगामातील तीसरी वेळ ठरली. सामन्याच्या शेवटच्या षटकात राजस्थानचा सलामीवर जोस बटलरने आपले शतक पूर्ण केले आहे. या हंगामातील त्याचे हे चौथे शतक ठरले आहे. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थानने बंगळुरूला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

त्यापूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं होतं. मात्र, बंगळुरूची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संघाचा सलामीवीर आणि माजी कर्णधार विराट कोहली अवघ्या सात धावा करून बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक संजू सॅमसनने त्याचा झेल टिपला. त्यानंतर आरसीबीचा कर्णधार फॅफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फॅफही झटपट बाद झाला. त्यापाठोपाठ आलेला मॅक्सवेलदेखील स्वस्तात माघारी परतला. या दरम्यान, रजत पाटीदारने एकाकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. पाटीदार बाद झाल्यानंतर मात्र, बंगळुरूची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला या मोसमात पहिल्यांदाच शेवटच्या पाच षटकांत ५० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. राजस्थानच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत टिच्चून मारा केला. त्यामुळे शेवटच्या चार षटकांत केवळ २५ धावा करणे शक्य झालं. १९व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेत बंगळुरूच्या वेगाला ब्रेक लावला. राजस्थानच्यावतीने प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 qualifier 2 rajasthan royals beat royal challengers bangalore enters into finals vkk
First published on: 27-05-2022 at 23:17 IST