नवी दिल्ली : के. एल. राहुल (पंजाब), श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन (तिघेही दिल्ली), भुवनेश्वर कुमार (हैदराबाद) आदी भारतीय खेळाडूंसह रशीद खान, डेव्हिड वॉर्नर (दोघेही हैदराबाद), फॅफ डय़ूप्लेसिस (चेन्नई) यांसारख्या परदेशी खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १५व्या हंगामापूर्वी संबंधित संघांनी ‘संघमुक्त’ करण्याचा निर्णय घेतला.

पाच वेळच्या विजेत्या मुंबईने इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा, अष्टपैलू किरॉन पोलार्ड या अनुभवी त्रिकुटासह फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवण्याला पसंती दिली. त्यांना अष्टपैलू हार्दिक पंडय़ा आणि यष्टीरक्षक इशान किशनला मुक्त करावे लागले. हार्दिकने अनेक वर्षे मुंबईसाठी विजयवीराची भूमिका बजावली. मात्र, मागील काही काळात कामगिरी सातत्य न राखल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले. मुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंना जानेवारीत होणाऱ्या भव्य लिलावप्रक्रियेत संघांना पुन्हा खरेदी करता येऊ शकेल.

मुंबईसह गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांनी प्रत्येकी चार खेळाडूंना संघात कायम ठेवले. महेंद्रसिंह धोनी चेन्नई, तर विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल बेंगळूरु संघाकडूनच खेळतील. ‘आयपीएल’मध्ये समावेश करण्यात आलेल्या लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांना अन्य संघांनी मुक्त केलेल्या खेळाडूंमधून तीन खेळाडूंची निवड करण्यासाठी १ ते २५ डिसेंबरदरम्यान मुदत देण्यात आली आहे.

कायम राखण्यात आलेले खेळाडू

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (१६ कोटी) जसप्रीत बुमरा (१२ कोटी) सूर्यकुमार यादव (८ कोटी) किरॉन पोलार्ड (६ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स

ऋषभ पंत (१६ कोटी)

अक्षर पटेल (९ कोटी)

पृथ्वी शॉ (७.५ कोटी) आनरिख नॉर्किए (६.५ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

विराट कोहली (१५ कोटी) ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी) मोहम्मद सिराज (७ कोटी)

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (१४ कोटी) जोस बटलर (१० कोटी) यशस्वी जैस्वाल (४ कोटी)

चेन्नई सुपर किंग्ज

रवींद्र जडेजा (१६ कोटी) महेंद्रसिंह धोनी (१२ कोटी) मोईन अली (८ कोटी)

ऋतुराज गायकवाड (६ कोटी)

कोलकाता नाइट रायडर्स

आंद्रे रसेल (१२ कोटी) वेंकटेश अय्यर (८ कोटी) वरुण चक्रवर्ती (८ कोटी) सुनील नरिन (६ कोटी)

सनरायजर्स हैदराबाद

केन विल्यम्सन (१४ कोटी) उमरान मलिक (४ कोटी) अब्दुल समद (४ कोटी)

पंजाब किंग्ज

मयांक अगरवाल (१२ कोटी)

अर्शदीप सिंग (४ कोटी)