आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने त्यांचा कर्णधार केएल राहुलला संघमुक्त केले आहे. पंजाब किंग्सने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंगला कायम ठेवले आहे. दिग्गज लेग-स्पिनर आणि पंजाब किंग्जचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मंगळवारी याबाबत खुलासा केला आहे. के. एल. राहुल (पंजाब), श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन (तिघेही दिल्ली), भुवनेश्वर कुमार (हैदराबाद) आदी भारतीय खेळाडूंसह रशीद खान, डेव्हिड वॉर्नर (दोघेही हैदराबाद), फॅफ डय़ूप्लेसिस (चेन्नई) यांसारख्या परदेशी खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १५व्या हंगामापूर्वी संबंधित संघांनी ‘संघमुक्त’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

फ्रँचायझी केएल राहुलला त्यांच्यासोबत ठेवू इच्छित होते, पण केएल राहुलने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि तो त्याचा अधिकार आहे, असे अनिल कुंबळे यांनी म्हटले. आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या मेगा लिलावात राहुलचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, केएल राहुल आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊच्या नव्या टीमचे नेतृत्व करू शकतो. दोन नवीन आयपीएल फ्रँचायझींकडे लिलावापूर्वी तीन खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय आहे.

अनिल कुंबळेंनी स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना याबाबात प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही त्याला (केएल राहुल) कायम ठेवू इच्छित होतो. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी आम्ही त्याची कर्णधार म्हणून निवड केली होती. पण त्याने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचा आदर करतो. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. तो खेळाडूचा विशेषाधिकार आहे, असे अनिल कुंबळे म्हणाले.

पंजाब किंग्जमध्ये सामील झाल्यानंतर राहुलने जोरदार फटकेबाजी केली. गेल्या चार हंगामात त्याने ६५९, ५९३, ६७० आणि ६२६ धावा केल्या. राहुलने आयपीएल २०२० मध्ये ऑरेंज कॅपही जिंकली होती.

मात्र, केएल राहुल कर्णधार म्हणून फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या दोन हंगामात पंजाबला लीग स्टेजच्या पुढे नेऊ शकला नाही. पंजाब किंग्जने २०१४ पासून एकही प्लेऑफ सामना खेळलेला नाही. पंजाबने मयंक अग्रवालला १२ कोटी रुपयांना रिटेन केले. त्याचवेळी अनकॅप्ड अर्शदीप सिंगला चार कोटींसाठी कायम ठेवण्यात आले. कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूला चार कोटी रुपयांपर्यंत अनकॅप केले जाऊ शकते. मयंक अग्रवालला पंजाबचा संघ आयपीएल २०२२२ मध्ये कर्णधार बनवू शकतो. त्याने २०२० मध्ये ४२० आणि २०२१ च्या हंगामा ४४१ धावा केल्या.