पीटीआय, अहमदाबाद
गुजरात टायटन्स संघ इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्सचा सामना करेल, तेव्हा त्यांचे लक्ष्य विजयी लय कायम राखत गुणतालिकेत शीर्ष दोन संघांमध्ये आपली जागा निश्चित करण्याकडे असेल. गुजरातचे १२ सामन्यांत १८ गुण असून त्यांचे ‘प्लेऑफ’मधील स्थान निश्चित झाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु व पंजाब किंग्ज यांचे १७ गुण झाले आहेत. त्यामुळे गुणतालिकेतील शीर्ष दोन स्थानांसाठी चुरस निर्माण झाली आहे.
गुजरातने या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे बी. साई सुदर्शन (६१७ धावा), कर्णधार शुभमन गिल (६०१ धावा) आणि जोस बटलर (५०० धावा) हे चांगल्या लयीत आहेत. संघाच्या अनेक विजयांमध्ये या तिघांनीही निर्णायक भूमिका पार पाडली आहे. तिघांनीही मिळून आतापर्यंत हंगामात १६ अर्धशतके व एक शतक झळकावले आहे. शीर्ष फळीच्या चांगल्या कामगिरीमुळे मध्यक्रमावर फारसा दबाव आला नाही. गुजरातच्या गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केली. भारताच्या प्रसिद कृष्णाने सर्वाधिक २१ गडी बाद केले आहेत. तर, मोहम्मद सिराज आणि साई किशोर यांनीही प्रत्येकी १५ बळी मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडाचेही पुनरागमन झाले आहे.
दुसरीकडे, सोमवारी सनरायजर्स हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर लखनऊच्या ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊच्या संघाला सलग चार सामने गमवावे लागले आहेत. लखनऊची फलंदाजी मिचेल मार्श, एडीन मार्करम आणि निकोलस पूरन यांवर अवलंबून आहे. पंतला संपूर्ण हंगामात सूर गवसलेला नाही. प्रमुख गोलंदाज जायबंदी झाल्याचा फटकाही संघाला बसला. मोहसिन खान व मयांक यादव यांना दुखापतीमुळे खेळता आले नाही. आवेश खान व आकाश दीप यांनाही तंदुरुस्तीच्या समस्येचा सामना करावा लागला. या सामन्यात लखनऊला दिग्वेश राठीशिवाय (१४ बळी) मैदानात उतरावे लागेल. गेल्या सामन्यात अभिषेक शर्मासह झालेल्या वादामुळे त्याच्यावर एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई झाली आहे.
● वेळ : सायं. ७.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.