Hardik Pandya may be released for IPL 2025 : आयपीएल २०२५च्या पार्श्वभूमीवर संघमालक आणि बीसीसीआय यांच्यात काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या वानखेडे कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला काही संघांचे मालक बीसीसीआय कार्यालयात उपस्थित होते, तर संघमालक ऑनलाईनच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. दरम्यान यामध्ये किती खेळाडूंना आयपीएल २०२५ साठी कायम ठेवायचे यावरही चर्चा झाली. या बैठकीतून अनेक धक्कादायक बातम्याही समोर येत आहे. ज्यामध्ये सर्वात मोठी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पशी संबंधित आहे. कारण मु वृत्तांवर विश्वास ठेवला तर मुंबई इंडियन्स त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याला सोडण्याची शक्यता आहे.

वास्तविक मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ पूर्वी हार्दिक पंड्याला पुन्हा आपल्या संघात सामील केले होते. तसेच फ्रँचायझीने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून या स्टार अष्टपैलू खेळाडूला दिले होते. तरीही, संघ काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकला नाही. आता मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला सोडणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचे कारण काय आहे जाणून घेऊया.

नियमांमध्ये कोणतेही बदल न झाल्यास संघ चार खेळाडूंना कायम ठेवू शकतील –

आयपीएलच्या नियमांनुसार दर तीन वर्षांनी मेगा ऑक्शन आयोजित केला जातो. यावेळी डिसेंबरमध्ये पुन्हा मेगा ऑक्शन होणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व १० संघांना प्रत्येकी चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असेल. मात्र, यावेळी कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढू शकते, असेही वृत्त आहे. याबाबत बीसीसीआय किंवा आयपीएलकडून अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण आता पाच खेळाडूंना कायम ठेवता येईल असा दावा काही अहवालात केला जात आहे.

हेही वाचा – IPL 2025 : ‘या’ खेळाडूंवर आयपीएलमध्ये दोन वर्षांची बंदी? सर्वच संघ चिंतेत! नेमकं कारण काय? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स या ४ खेळाडूंना कायम ठेवू शकते –

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना कोणत्याही किंमतीत कायम ठेवायचे आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी हार्दिक पंड्याला सोडण्याची शक्यता आहे. कारण सूर्यकुमार आता टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी आपल्या संघाची धुरा त्याच्याकडे सोपवू शकते. सूर्या कर्णधार झाला, तर त्याच्या नेतृत्वाखाली रोहित खेळताना दिसू शकतो.

हेही वाचा – IND vs SL: ‘IPL वाला रुल है क्या…’, केएल राहुलने वनडे सामन्यात रोहितला विचारला भलताच प्रश्न, VIDEO व्हायरल

त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ साठी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवू शकते, अशी चर्चा आहे. फ्रँचायझीला आता नवीन संघ तयार करायचा आहे यात शंका नाही. अशा स्थितीत आगामी हंगामात संघात अनेक नवीन खेळाडू पाहायला मिळू शकतात. त्यामुळे हार्दिक पंड्या मेगा ऑक्शनमध्ये दिसू शकतो. जर हार्दिक पंड्या ऑक्शनमध्ये आला, तर त्याला मोठी बोली लागू शकते. तसेच प्रत्येक संघ त्याला खरेदी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील.