मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाजांचे तारांकित त्रिकुट मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. तसेच नेथन एलिस संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तो चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणार होता.
कमिन्स आणि हेझलवूड यांना दुखापतीमुळेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागले होते. आता ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ (सीए) त्यांच्याबाबत खबरदारी घेत आहे. ऑस्ट्रेलिया संघ ऑगस्टनंतर वर्षभराच्या कालावधीत २१ कसोटी सामने खेळणार आहे. त्यासाठी सर्व तारांकित खेळाडूंनी उपलब्ध असावे अशी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ची इच्छा आहे. ऑस्ट्रेलियातील गेल्या क्रिकेट हंगामात कमिन्सला ॲशेस मालिकेतील केवळ एक कसोटी सामना खेळता आला. तो पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला आणखी काही दिवस लागणे अपेक्षित आहे.
त्यामुळे तो २८ मार्चपासून सुरू होणार्या ‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. तो या स्पर्धेत सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. त्याचा सहकारी हेझलवूड गुडघा आणि घोट्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण ॲशेस मालिकेत खेळू शकला नव्हता. तो ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. दुसरीकडे, स्टार्क दिल्ली कॅपिटल्सकडून सर्व सामने खेळणे अपेक्षित होते. परंतु कार्यभार व्यवस्थापनांतर्गत तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.
