BCCI No Girlfriend Policy: जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आयपीएल स्पर्धा आपल्या १९ व्या हंगामात आहे. आतापर्यंत या स्पर्धेत अनेक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेतील १९ व्या हंगामात खेळाडू आणि संघ व्यवस्थापकांकडून नियमांच्या सतत होणाऱ्या उल्लंघनाबाबत कडक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. लवकरच बीसीसीआयकडून कडक पावलं उचलली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे.
बीसीसीआय नो गर्लफ्रेंड पॉलिसी लागू करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान अनेक असे भारतीय खेळाडू आहेत जे आपल्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसून आले आहेत. काही खेळाडू विमानतळावर आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसून आले आहेत. ज्यात हार्दिक पंड्या, इशान किशन आणि अर्शदीप सिंग ही नावं आघाडीवर आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे की, एकदा नियमावली जाहीर केल्यानंतर, जर कुठल्याही खेळाडूने नियम मोडले, तर त्यांच्या कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तो खेळाडू असो किंवा संघातील कुठला अधिकारी, जर चूक करताना आढळला, तर त्याला कारवाईला सामोरं जावं लागेल.
आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान काही प्रकरणं तुफान चर्चेत राहिली आहेत. राजस्थान रॉयल्स संघाचे संघव्यवस्थापक रोमी भिंडर डगआऊटमध्ये बसून मोबाईल वापरताना दिसून आले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. बीसीसीआयने त्यांच्यावर दंड आकारला होता. त्यानंतर रियान पराग ई-सिगारेट ओढताना दिसून आला होता. हे प्रकरण देखील चांगलच गाजलं होतं. बीसीसीआयने रियान परागच्या मॅच फी वर २५ टक्के दंड आकारला होता.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितले की, “काही संघांचे मालक आणि अधिकारी खेळाडूंसोबत अशा ठिकाणी मुक्तसंचार करत आहेत, जिथे त्यांना प्रवेश करण्याची अजिबात परवानगी नाही. आम्ही या प्रकरणांकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरने मोबाईल वापरल्याची, एका खेळाडूने वेपिंग केल्याची घटना आधीच घडली आहे. काही अनधिकृत लोक टीम बसमधून खेळाडूंसोबत प्रवास करत आहेत. काही लोकं टीम हॉटेलमध्ये राहत आहेत. हे लोक परवानगीशिवाय खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या खोलीत जात आहेत. या सर्व गोष्टी बीसीसीआयच्या अँटी-करप्शन प्रोटोकॉलच्या विरोधात आहे.” असं देवजीत सैकिया म्हणाले.
