Cricket Australia Slams Ajinkya Rahane over Cameron Green Bowling: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. रहाणेने म्हटलं होतं की ऑलराउंडर कॅमेरून ग्रीनने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात एकही चेंडू का टाकला नाही, याचं कारण तुम्ही ऑस्ट्रेलियन बोर्डाला विचारा. यावर बोर्डाने आता रहाणेला सुनावलं आहे. केकेआरने २५ कोटी खर्च करून अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला ताफ्यात सामील केलं, पण पहिल्या सामन्यात त्याने एकही चेंडू टाकला नाही.
रविवारी, २९ मार्चला झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सकडून मोठ्या फरकाने पराभव झाला. २२१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने ६ विकेट्स राखून आणि ५ चेंडू बाकी ठेवत लक्ष्य सहज गाठलं. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करत पहिल्याच १० षटकांत सामना जवळपास एकतर्फी केला.
दुखापतींशी झुंजत असलेल्या केकेआर संघाला अननुभवी गोलंदाजी आक्रमणामुळे मोठा फटका बसला. हर्षित राणा, आकाशदीप हे दोन्ही गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले आहेत. तर अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने या सामन्यात गोलंदाजी केलेली नाही. चांगल्या गोलंदाजीच्या शोधात असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला त्यांचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनकडे वळता आलं नाही. त्याला तब्बल २५.२० कोटी रुपयांच्या विक्रमी किंमतीत खरेदी करण्यात आलं होतं.
अजिंक्य रहाणे कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीबाबत सामन्यानंतर काय म्हणाला होता?
पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे स्पष्टपणे नाराज दिसला. ग्रीनने एकही षटक का टाकलं नाही, असा प्रश्न विचारल्यावर रहाणेने ही हा प्रश्न तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा, असं सांगत सूचकपणे बोर्डाने त्याच्यावर मर्यादा घातल्याचा इशारा दिला. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी यावर प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं की आयपीएलच्या सुरुवातीच्या १० ते १२ दिवसांत ग्रीन गोलंदाजी करणार नाही, याची माहिती कोलकाताला आधीच देण्यात आली होती.
“कॅमेरूनला पाठीच्या दुखापत झाली आहे. त्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे काही काळ त्याला गोलंदाजी करणं टाळावी लागेल,” असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितलं. “कॅमेरून सध्या भारतात आपली गोलंदाजीची तयारी पुन्हा सुरू करत आहे आणि साधारण १० ते १२ दिवसांत तो पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होईल. कोलकाता नाइट रायडर्सला याबाबत आधीच माहिती देण्यात आली ‘आहे आणि त्यांना या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे,” असं पुढे सांगण्यात आलं.
ग्रीनच्या गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे कोलकातासमोर अडचणी वाढल्या आहेत. संघ आधीच हर्षित राणा आणि मथीशा पाथिराना यांच्या दुखापतींशी झुंजत आहे, तसेच त्यांच्या महत्त्वाच्या खरेदींपैकी एक असलेल्या मुस्ताफिझुर रहमानला देखील संघातून रिलीज कराव लागलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, ग्रीन किमान आयपीएलमधील पहिल्या चार सामन्यांत गोलंदाजी करणार नाही, अशी शक्यता आहे.
