Black Magic In SRH vs CSK Match: आयपीएल २०२६ स्पर्धेतील २७ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना चेन्नईच्या हातून थोडक्यात निसटला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी बाद १९४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईने पूर्ण जोर लावला. पण हा सामना १० धावांनी गमवावा लागला. पण या विजयाहून अधिक चर्चा रंगली ती काळया जादूची. हा सामना सुरू असताना एका चाहत्याने काळा जादू केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान याविरोधात चेन्नई सुपर किंग्जने औपचारिक तक्रार केल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात चेन्नईची फलंदाजी सुरू असतानाचा हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, चेन्नईची फलंदाजी सुरू असताना सनरायझर्स हैदराबादची जर्सी परिधान केलेला एक चाहता स्टँड्समध्ये लिंबू फिरवताना दिसून येत आहे. त्यानंतर काहीतरी बोलून तो लिंबू फेकतो आणि मग पुढच्याच चेंडूवर शिवम दुबे बाद होतो. हा एडिट केलेला व्हिडिओ आहे. पण स्टेडियममध्ये असा काही प्रकार घडणं हे कितपत योग्य आहे, अशी चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्जकडून बीसीसीआयकडे तक्रार?

हा व्हिडिओ व्हायरल होताच,चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक बनावट अधिकृत तक्रार पत्राचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, विरोधी संघाच्या चाहत्यांकडून काळया जादूचा प्रकार करण्यात आल्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. पण हा व्हायरल होत असलेला फोटो खोटा आणि बनावट असून फोटोशॉपवर एडिट करण्यात आला आहे. आता हा फोटो एक मीम म्हणून शेअर केला जात आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने ५९ धावांची दमदार खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने २३ धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने ५९ धावांची खेळी केली. हैदराबादने २० षटकांअखेर ९ गडी बाद १९४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून मॅट शॉर्टने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. तर आयुष म्हात्रेने ३० आणि सर्फराज खानने २५ धावांची खेळी केली. पण चेन्नईचा संघ विजयापासून १० धावा दूर राहिला.