Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings: आयपीएल २०२६ स्पर्धेतील २७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात हैदराबादने पहिल्या डावात फलंदाजी करताना ९ गडी बाद १९४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला सुरुवात तर चांगली मिळाली होती. पण हवा तसा शेवट करता आला नाही. चेन्नईचा संघ विजयापासून १० धावा दूर राहिला. यासह हैदराबादने या स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे.
चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. संजू सॅमसन ७ धावांवर माघारी परतला. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रेवर जबाबदारी होती. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. ऋतुराजने १९ धावा केल्या. तर आयुष म्हात्रेने ३० धावांचे योगदान दिले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्टने एकेरी दुहेरी धाव घेऊन डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील ३० धावा करून माघारी परतला. सर्फराज खानने २५ धावांचे योगदान दिले. डेवाल्ड ब्रेव्हिस शून्यावर माघारी परतला. शिवम दुबे २१ धावा करून माघारी परतला. त्यानंतर शेवटी अंशूल कंबोज आणि ओव्हरटनने विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण हैदराबादने हा सामना १० धावांनी आपल्या नावावर केला.
सनरायझर्स हैदराबादने केल्या १९४ धावा
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पावरप्लेमध्ये ७५ धावा जोडल्या. अभिषेकने १५ चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याने २२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने ५९ धावांची खेळी केली. तर ट्रॅव्हिस हेडने २३ धावांचे योगदान दिले. कर्णधार इशान किशन शून्यावर माघारी परतला. हेनरिक क्लासेनने ३९ चेंडूत ५९ धावा केल्या. यासह ऑरेंज कॅपवर कब्जा केला. शेवटी नितीश रेड्डीने १२ धावांची खेळी केली. यासह सनरायझर्स हैदराबादने ९ गडी बाद १९४ धावा केल्या.
गोलंदाजांची दमदार कामगिरी
या सामन्यातील शेवटचे षटक प्रफुल हिंगेने टाकले. सुरूवातीच्या ३ षटकांमध्ये तो खूप महागडा ठरला होता. पण तरीही इशान किशनने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि प्रफुलने हा विश्वास सार्थ ठरवला आणि विजय मिळवून दिला. हैदराबादकडून इशान मलिंगाने ३, नितीश कुमारने २, प्रफुल हिंगे, साकिब हुसेन आणि शिवांग कुमारने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
