अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणारे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स हे संघ आज, रविवारी जेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. यावेळी बंगळूरुचा ‘आयपीएल’ करंडक आपल्याकडेच राखण्याचा प्रयत्न असेल, तर गुजरातला सामना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकेल. बंगळूरुने आपल्या आक्रमक खेळाने स्पर्धेमध्ये दबदबा निर्माण केला आहे. त्याच वेळी गुजरातने धैर्याने खेळत पाच वर्षांत तिसर्‍यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे.

आक्रमक खेळाच्या शैलीमुळे बंगळूरुला बरेचदा फायदा झाला आहे. काही वेळा संघ अडचणीतही सापडला आहे. ‘क्वॉलिफायर-१’मध्ये बंगळूरुने आपल्या याच शैलीने गुजरातला पराभूत केले होते. खेळपट्टीची स्थिती आणि विरोधी संघाची रणनीती यांचा बंगळूरुच्या आक्रमक खेळावर फारसा परिणाम होत नाही. बंगळूरुने यावेळी बर्‍याचदा २०० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. कर्णधार रजत पाटीदारच्या शांत आणि संतुलित नेतृत्वामुळे गेल्या दोन हंगामात संघाला स्थिरता मिळाली आहे.

बंगळूरुचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सप्रमाणे सलग दोन ‘आयपीएल’ जेतेपद मिळविणारा संघ बनण्याचे असेल. बंगळूरुची लय पाहता अंतिम लढतीत त्यांचेच पारडे जड मानले जात आहे. गुजरातचा संघही दुसर्‍या जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे.

गिल, रबाडाकडून अपेक्षा

’गुजरातचे सलामीवीर कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणार्‍या अव्वल तीन फलंदाजांमध्ये या दोघांचा समावेश आहे. मात्र, गुजरातची मधली फळी कमकुवत दिसते. गिल, सुदर्शन आणि जोस बटलर लवकर बाद झाल्यास गुजरात संघ अडचणीत सापडेल.

’गिल ७२२ धावा (स्ट्राइक रेट १६३), सुदर्शन ७१० धावा (स्ट्राइक रेट १५९) आणि बटलर ५०७ धावा (स्ट्राइक रेट १५७) यांच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. आता निर्णायक सामन्यातही त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. गुजरातने यंदा घरच्या मैदानावर सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यातही या तिघांचे महत्त्वाचे योगदान होते.

’गोलंदाजीत कगिसो रबाडा यावेळी २८ बळींसह ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत पुढे आहे. त्याच्यासह मोहम्मद सिराज, रशीद खान, जेसन होल्डर आणि प्रसिध कृष्णा यांसारखे गोलंदाजही गुजरातकडे आहेत. सुरुवातीला बळी मिळवण्याची जबाबदारी सिराज व रबाडा यांच्यावर असेल.

पाटीदार, कोहलीवर भिस्त

’बंगळूरुच्या गोलंदाजांनी गतहंगामाप्रमाणेच या वेळीही प्रभावी कामगिरी केली आहे. विशेषत: ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे.

’भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली या गोलंदाजी आक्रमणाला गुजरातच्या शीर्ष फळीविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. भुवनेश्वर २६ बळी मिळवत ‘पर्पल कॅप’च्या यादीत दुसर्‍या स्थानी आहे.

’जोश हेझलवूड (१३ बळी), रसिक  सलाम दार (१६ बळी) आणि कृणाल पंड्या (१३ बळी) यांच्यामुळे बंगळूरुचे गोलंदाजी आक्रमण भक्कम दिसते. कृणालने फलंदाजीतही योगदान दिले आहे.

’बंगळूरुकडे विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, टीम डेव्हिड, कर्णधार रजत पाटीदार, उपलब्ध झाल्यास फिल सॉल्ट आणि वेंकटेश अय्यर यांनी वेळोवेळी चमक दाखवली आहे. गेल्या सामन्यात पाटीदारने अप्रतिम फलंदाजी केली होती. कोहलीने सातत्य राखले आहे. या दोघांवर बंगळूरुची प्रामुख्याने भिस्त असेल.

फलंदाजांना पूरक खेळपट्टी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजांना पूरक समजली जाते. यावेळी ही अशीच खेळपट्टी अपेक्षित आहे. या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळते. त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या होणे अपेक्षित आहे. लीगच्या या हंगामात २००हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स  हे संघ आजवरच नऊ  वेळा ‘आयपीएल’मध्ये आमनेसामने आले आहे. यात बंगळूरुने पाच, तर गुजरातने चार विजय मिळवले आहेत.

संघ (संभाव्य १२)

गुजरात टायटन्स

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टिरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंगटन सुंदर, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, कगिसो रबाडा, प्रसिध कृष्णा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), वेंकटेश अय्यर, टीम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), कृणाल पंड्या, रसिक दार, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवूड.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता  ल्लथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओहॉटस्टर ॲप.