Gujarat Titans vs Kolkata Knight Riders: आयपीएल २०२६ स्पर्धेतील २५ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इतर संघ नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्यावर अधिक भर देताना दिसून येत आहेत. पण कोलकाता नाईट रायडर्सचा हा धाडसी निर्णय फसला.
कारण कॅमेरून ग्रीनचं अर्धशतक वगळलं, तर इतर कुठलाही फलंदाज योगदान देऊ शकलेला नाही. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा डाव १८० धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सकडून शुबमन गिलने दमदार ८६ धावांची खेळी केली आणि गुजरातला विजय मिळवून दिला. यासह कोलकाताने लागोपाठ पाचवा सामना गमावला.
गुजरात टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी १८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या साई सुदर्शन आणि शुबमन गिलने पहिल्या विकेटसाठी ५७ धावा चोपल्या. साई सुदर्शन २२ धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर गिलने जोस बटलरसोबत मिळून डाव सावरला. बटलर २५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर १३ धावा करून माघारी परतला. गिलकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचं शतक १४ धावांनी हुकलं. गुजरातने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला.
कोलकाताने केल्या १८० धावा
या सामन्यात कोलकता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीला आलेला अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर टीम सेफर्ट १९ धावांवर माघारी परतला. अंगकृष रघुवंशीने ८ धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून एकटा कॅमेरुन ग्रीन खंबीरपणे उभा राहिला. त्याने रोमन पॉवेलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. पॉवेलने २७ धावांचे योगदान दिले. शेवटी रमनदीप सिंगने १७ धावांचे योगदान दिले. २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ग्रीन ७९ धावांवर बाद झाला. कोलकाताने २० षटकांअखेर १८० धावा केल्या.
