पीटीआय, कोलकाता

कोलकाता नाइट रायडर्स संघाला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यातील भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप हा पाठीच्या दुखापतीमुळे पूर्ण हंगामात खेळू शकणार नाही.दुखापतीमधून बरे होण्यासाठी आकाश दीपला किमान आठ आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. केवळ ‘आयपीएल’च नाही, तर जूनच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्ध होणार्‍या एकमेव कसोटी सामन्यासही त्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

रणजी करंडक स्पर्धेत खेळतानाच आकाश दीप पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे जाणवत होते. उपांत्य फेरीत जम्मू काश्मीरविरुद्ध खेळताना त्याने दोन्ही डावांत मिळून केवळ २० षटके गोलंदाजी केली होती. कोलकाता संघाच्या बुधवारपासून सुरू झालेल्या सरावातही तो सहभागी झाला नाही.

‘‘दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी बराच वेळ लागेल. आकाश दीपला शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी अंदाजे दहा आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक काळ लागू शकेल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकार्‍याने सांगितले.

आकाश दीपच्या जायबंदी होण्यामुळे कोलकाता संघाच्या वेगवान गोलंदाजीच्या क्षमतेवर मर्यादा निर्माण झाल्या आहेत. हर्षित राणा आणि श्रीलंकेचा मथीशा पथिराना या दोन प्रमुख गोलंदाजाच्या दुखापतींचा फटका संघाला बसला आहे. अशा वेळी वैभव अरोरा, कार्तिक त्यागी आणि तंदुरुस्त झालेला उमरान मलिक यांसारख्या देशांतर्गत पर्यायांवर कोलकाता संघाला अवलंबून राहावे लागेल.

चिंतेची गरज नाही -ब्राव्हो

अभिषेक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता संघ सध्या बदली खेळाडूंच्या शोधात असून त्यांनी आकाश मधवाल, नवदीप सैनी, सिमरजीत सिंग, के.एम.आसिफ आणि संदीप वॉरियर यांसारख्या ‘आयपीएल’चा अनुभव असलेल्या गोलंदाजांच्या चाचण्या घेतल्या आहेत. संघाचे मुख्य मार्गदर्शक ड्वेन ब्राव्होने याबद्दल चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ‘‘महत्त्वाचे गोलंदाज गमावणे ही नियोजित गोष्ट नसते, पण ती स्वीकारली पाहिजे. भारतीय क्रिकेटची जमेची बाजू म्हणजे इथे खूप पर्याय आहेत. उमरान मलिक, कार्तिक त्यागी, वैभव अरोरा यांसारखे तरुण आणि उत्साही गोलंदाज आमच्याकडे आहेत. आम्ही काही महत्त्वाचे खेळाडू गमावले असले तरी, त्यांच्या जागी सक्षम खेळाडू आहेत याचा मला आनंद आहे,’’ असे ब्राव्होने सांगितले.