GT vs KKR, IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेतील २५ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताचा डाव २० षटकांअखेर १८० धावांवर आटोपला. कोलकाताकडून कॅमेरुन ग्रीनने ७९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक खणखणीत षटकार मारला, जो कारला जाऊन लागला. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सुरुवातीलाच मोठे धक्के बसल्यानंतर कॅमेरुन ग्रीनने मोर्चा सांभाळला. त्याने अनुकूल रॉयसोबत मिळून अर्धशतकी भागीदारी केली. कोलकाताचा सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ग्रीनकडून कोलकाताला अशाच एका खेळीची गरज होती. कारण गोलंदाजी आणि फलंदाजीतही ग्रीनचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. यादरम्यान ग्रीनने मारलेल्या षटकारामुळे आता आयपीएल स्पर्धेच्या प्रायोजकांना पर्यावरण उपक्रमासाठी ५ लाख रूपयांची देणगी द्यावी लागणार आहे.
तर झाले असे की, कोलकाता नाईट रायडर्स संघाची फलंदाजी सुरु असताना १३ वे षटक टाकण्यासाठी अशोक शर्मा गोलंदाजीला आला. त्यावेळी कॅमेरुन ग्रीन स्ट्राईकवर होता. या षटकातील तिसरा चेंडू त्याने त्याच्या पट्ट्यात चेंडू टाकला. ग्रीनने लेग साईडला जोरात बॅट फिरवली आणि चेंडू ६ धावांसाठी भिरकावून दिला. हा चेंडू स्टँड्समध्ये असलेल्या कारला जाऊन लागला. त्यामुळे कारच्या खिडकीजवळ डेंट आला. स्टँड्समध्ये असलेल्या कारला जाऊन चेंडू लागल्यास प्रायोजकांना ५ लाख रूपये हे पर्यावरण उपक्रमासाठी देणगी म्हणून द्यावे लागतात.
कोलकाताने केल्या १८० धावा
या सामन्यात नाणेफेक जिंकताच कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला. कारण कोलकाताला सुरुवातीला मोठे धक्के बसले. कर्णधार अजिंक्य रहाणे गोल्डन डकवर माघारी परतला. टीम सेफर्टने १९ धावा केल्या. तर अंगकृष रघुवंशी ८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि अनुकूल रॉयने मिळून डाव सांभाळला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. एकट्या ग्रीनने ७९ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कोलकाताचा डाव १८० धावांवर आटोपला.
