आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर आहे. आतापर्यंत जे संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी होते, ते संघ आता खाली सरकू लागले आहेत. तर खालच्या स्थानी असलेले संघ टॉप ४ मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. आतापर्यंत पंजाब किंग्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. आता सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे.

हैदराबादची नंबर १ स्थानी झेप

सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२६ स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. पण गेल्या ५ पैकी ४ सामन्यांमध्ये हैदराबादने दमदार विजयाची नोंद केली आहे. या विजयासह हैदराबादने ११ पैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यासह १४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आता हैदराबादकडे टॉप २ मध्ये स्थान कायम ठेवण्याची संधी आहे. तर पंजाबचा संघ आतापर्यंत गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. पण गेल्या ३ सामन्यांमध्ये पंजाबला लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागला आहे. १० पैकी ६ सामने जिंकून १३ गुणांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी घसरला आहे.

पंजाबच्या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघांना दिलासा मिळाला आहे. कारण या संघांकडे देखील टॉप २ मध्ये फिनिश करण्याची संधी आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या तिन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी १२-१२ गुणांची कमाई केली आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघ १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे.

हैदराबादचा विजय

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात सनराझर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ५५ धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडने ३८ धावा केल्या. या खेळीच्या बळावर हैदराबादने ४ गडी बाद २३५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून कुपर कॉनोलीने नाबाद १०७ धावांची खेळी केली. तर त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. पंजाबने हा सामना ३३ धावांनी गमावला.