आयपीएल २०२६ ची तयारी आधीच सुरू झाली आहे. अनेक संघांनी त्यांचे कॅम्पही सुरू केले आहेत. दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा सुरू होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेलं नसलं तरी, आता असं समोर येत आहे की स्पर्धा ठराविक वेळेनुसार दोन दिवसांनी पुडे ढकलली जाणार आहे. पहिल्या सामन्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

आयपीएल २०२६ चा पहिला सामना कधी खेळवला जाईल हे बीसीसीआयने अद्याप जाहीर केलेलं नाही. पण, पूर्वी समोर आलेल्या वृत्तांनुसार पहिला सामना २६ मार्च रोजी खेळवला जाईल. पण आता समोर आलेल्या वृत्तांनुसार ही तारीख एक-दोन दिवस पुढे ढकलली जाऊ शकते. पण, बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल २०२६ मधील पहिला सामना २८ मार्च रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे, परंतु २९ मार्चचाही विचार केला जात आहे. २८ मार्च हा शनिवार आहे आणि २९ मार्च हा रविवार आहे, ज्यामुळे चाहत्यांचा स्पर्धेला योग्य तो प्रतिसाद देखील लाभू शकतो.

संपूर्ण आयपीएल हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआय मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने २६ मार्च रोजी आयपीएल सुरू होण्याची घोषणा केली नसली तरी, अंतर्गत चर्चा सुरू होती. तसेच, जेव्हा लिलाव झाला त्यावेळी संघांना हीच तारीख सांगण्यात आली होती. सुरुवातीला ३१ मे ही अंतिम फेरीसाठी निश्चित करण्यात आली होती, पण आता आलेल्या माहितीनुसार स्पर्धेची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. निवडणुकांसोबत आयपीएल स्पर्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांशी टक्कर होऊ नये म्हणून आयपीएलचे स्पर्धेच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक आयोगाने राज्य निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्याचे सुरुवातीला नियोजन होते. पण, फार विलंब होत असल्याने पुढील आठवड्यात वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

सुरूवातीला फक्त स्पर्धेचं अर्ध वेळापत्रक जाहीर केलं जाईल, परंतु निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि बदल नंतर जाहीर केले जातील.